...तर अमेरिकेचा जर्मनीपेक्षा मोठी भरपाई चीनकडे मागण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:28 AM2020-04-29T04:28:29+5:302020-04-29T04:28:55+5:30
प्रयोगशाळेत झालेल्या एका अपघातामुळे हा विषाणू हवेत मिसळला, असाही दावा काही देशांतील संशोधकांनी केला होता. चीनने मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.
वॉशिंग्टन : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रकरणाचा अमेरिका कसून तपास करत आहे. चीनकडे १३० अब्ज युरोची भरपाई मागण्याचा जर्मनीचा विचार आहे. त्यापेक्षाही अधिक रकमेच्या भरपाईची मागणी अमेरिका चीनकडे करू शकते, असा इशारा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिला.
हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प बोलत होते. चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून कोरोना विषाणूच्या साथीला सुरुवात झाली. आतापर्यंत जगभरातील ३० लाखांहून अधिक लोकांना ‘कोविड-१९’ या भयंकर रोगाची लागण झाली असून दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. या साथीने अमेरिकेपाठोपाठ युरोपमध्येही हाहाकार माजविला आहे.
चीनने कोरोना साथीविषयी वेळीच सर्व जगाला सावध करायला हवे होते. त्यामुळे जगभर होत असलेली जीवित आणि वित्तहानी टाळता आली असती, असे अमेरिका, ब्रिटन, जर्मनीसह अनेक देशांचे मत आहे. कोरोना विषाणूमुळे झालेल्या भीषण नुकसानीची भरपाई चीनकडून वसूल करण्याचा विचार या देशांमध्ये बळावत आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत जैविक युद्धासाठी या भयंकर विषाणूची निर्मिती करण्यात आली होती. मात्र प्रयोगशाळेत झालेल्या एका अपघातामुळे हा विषाणू हवेत मिसळला, असाही दावा काही देशांतील संशोधकांनी केला होता. चीनने मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.
>एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न
कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर सातत्याने निशाणा साधत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोविड-१९’ या महामारीच्या प्रकरणात चीनची बाजू घेतल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून या संघटनेला देण्यात येणारा निधी रोखला आहे. अमेरिकेच्या या कृतीनंतर चीनने जागतिक आरोग्य संघटनेला काही प्रमाणात निधी दिला. चीनने या विषाणूबाबतची खरी माहिती जगापासून दडवून ठेवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. तो चीनला अमान्य आहे. एकंदरित, कोरोना साथीच्या मुद्द्यावरून चीन व अमेरिकेचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.