सेऊल, दि. 13 - 1960च्या दशकात जेव्हा उत्तर कोरियाच्या कमांडोंनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती भवनाला लुटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दक्षिण कोरियानं गुप्तरीत्या जेलमधील काही कैद्यांना उत्तर कोरियामध्ये घुसून त्यांचा हुकूमशहा किम उल-संग याला मारण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. आता त्यांचे नातू किम जोंग ऊनसुद्धा स्वतःच्या मिसाइल प्रोग्रामला प्रोत्साहन देतायत. त्यामुळे सेऊल सरकार पुन्हा एकदा प्योंगयांगच्या नेतृत्वाला निशाणा बनवण्यासाठी एक खास युनिट तयार करत आहे. त्या युनिटला खास करून गळा चिरण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे.उत्तर कोरियाच्या सहाव्या सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब चाचणीच्या एक दिवसानंतरच दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री साँग यंग मू ने यांनी यांची घोषणा केली होती. या वर्षाच्या शेवटाला एक खास फोर्स तयार करण्यात येणार आहे. त्याला संरक्षण मंत्र्यांनी डिकॅपिटेशन युनिटचं नाव दिलं आहे. ज्याचा उद्देश उत्तर कोरियाच्या नेत्यांचा गळा चिरणं आहे. उत्तर कोरियाला कडक इशारा देण्यासाठी दक्षिण कोरिया हे युनिट बनवत आहे. संरक्षण अधिका-यांच्या मते, या युनिटमधली हेलिकॉप्टर आणि हवाई जहाजे सीमा पार जाऊन रेड टाकण्यासाठी सक्षम असेल.एका रात्रीत हे युनिट उत्तर कोरियामध्ये घुसू शकतं, अशी याची क्षमता आहे. दक्षिण कोरियाचा या युनिटच्या माध्यमातून उत्तर कोरियाला घाबरवण्याच्या प्रयत्नात आहे. तुम्ही जर मिसाइल प्रोग्रामला प्रोत्साहन दिलंत, तर त्याचे परिणाम भोगा, अशाच प्रकारचा इशाराच दक्षिण कोरियानं दिला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचे पश्चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी उत्तर कोरियाला आव्हान देणा-या देशांना इशारा दिला होता. आमच्याकडे असंख्य अणुबॉम्ब असून, त्यातल्या केवळ तीन अणुबॉम्बनी संपूर्ण जगाचा नायनाट होऊ शकतो," अशी धमकी उत्तर कोरियाच्या पश्चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी दिली होती.ते म्हणाले, उत्तर कोरियाला कोणीही हात लावू शकत नाही. जर असं झाले तर लोक बंदुका आणि मिसाइलनं देशाची सुरक्षा करतील. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब आहेत. त्यातील तीन अणुबॉम्ब हे पूर्ण जगाला नेस्तनाबूत करण्यासाठी पुरेसे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील इसिसच्या तळांवर अमेरिकेनं "मदर ऑफ ऑल बॉम्ब" टाकला होता. इसिसला दिलेल्या दणक्यानंतर अनेक देशांकडून उत्तर कोरियाला धमक्या येत आहेत. एका स्पॅनिश न्यूज साइटशी बोलताना बेनोस यांनी उत्तर कोरियाच्या युद्धविषयक अभ्यासाचीही माहिती दिली होती."उत्तर कोरिया हा स्वप्नलोक आहे. उत्तर कोरियात लोकांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ते स्वतःचं जीवन अतिशय शांततेच्या मार्गानं जगत आहेत. त्याप्रमाणेच उत्तर कोरियात कोणत्याही प्रकारचा सामाजिक संघर्ष उद्भवत नाही. उत्तर कोरियात सर्व नागरिक एकमेकांच्या सहकार्यानं आपली कामं करत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. तर अमेरिकेची युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सनला एका हल्ल्यात नेस्तनाबूत करू, अशी धमकी उत्तर कोरियानं दिली आहे, असं वृत्त सत्ताधारी वर्कर पक्षाच्या मुखपत्रातून छापून आलं आहे. आमची सेना अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका समुद्रात डुबवण्यास सज्ज आहे, असा इशारा उत्तर कोरियानं अमेरिकेला दिला होता. त्यामुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊनच्या हत्येसाठी दक्षिण कोरियाचं खास युनिट सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 3:24 PM