पाकिस्तानमध्ये संसदेचे विशेष संयुक्त अधिवेशन? ट्रम्प धोरणाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:50 AM2017-08-26T01:50:28+5:302017-08-26T01:50:32+5:30
अतिरेक्यांना आश्रय देणाºया पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार आपली पुढील दिशा ठरविण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तयारी करत आहे.
इस्लामाबाद : अतिरेक्यांना आश्रय देणाºया पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार आपली पुढील दिशा ठरविण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तयारी करत आहे.
डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी सिनेटमध्ये आपल्या भाषणात संकेत दिले आहेत की, या विषयायवर चर्चेसाठी संयुक्त अधिवेशन बोलविले जाऊ शकते. अमेरिकेची भूमिका एक गंभीर विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॅबिनेटने मंगळवारी या विषयावर तीन तास विचारविमर्श केला आहे. तर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने (एनएससी) यावर चार तास चर्चा केली आहे. सिनेटचे अध्यक्ष रजा रब्बानी यांनी पंतप्रधानांना सूचित केले आहे की, अमेरिकी अध्यक्षांच्या आक्रमक विधानांनंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी सिनेट पॅनलची स्थापना करण्यात आली आहे.
पाकिस्तानने म्हटले आहे की, पाकिस्तानला दिल्या जाणाºया आर्थिक मदतीबाबत थट्टा करण्यापूर्वी अमेरिकेने याचा विचार करावा की, पाकिस्तानला युद्धात झालेल्या १५० अब्ज डॉलरच्या नुकसानीपैकी काहीच रक्कम त्यांनी दिलेली नाही. सिनेट सदस्यांनी म्हटले आहे की, तत्कालिन लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी अमेरिकेच्या समोर पूर्ण आत्मसमर्पण केल्यानंतर आणि देशात झालेल्या स्फोटामुळे पाकिस्तानातातील शैक्षणिक
संस्था, आरोग्य सुविधा आणि अन्य सुविधांवर याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. (वृत्तसंस्था)
पाकने कृती करावी : अमेरिका
व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ‘दहशतवाद आणि चर्चा या क्रिया एकाचवेळी होऊ शकत नाहीत’ही भारताची भूमिका आम्ही जाणून आहोत. तथापि, भारतात हल्ले घडवून आणणाºया लष्कर -ए-तोयबा आणि जैश -ए-मोहम्मद यासारख्या अतिरेकी संघटनांवर कडक कारवाई करण्यास पाकला सांगण्यात आले.
अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हाती पडू शकतात
वॉशिंग्टन : पाकिस्तानचे आण्विक शस्त्रे अतिरेक्यांच्या हाती लागण्याची भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या दक्षिण आशियाच्या धोरणात याचा उल्लेख करण्यात आला आहे की, हे आण्विक शस्त्रे चुकीच्या हातात पडायला नकोत. पाकिस्तानकडे आजच्या घडीला १०० पेक्षा जास्त आण्विक शस्त्रे आहेत. तर, २०० ते ३०० आण्विक शस्त्रांची सामग्री त्यांच्याकडे आहे.