श्रीलंकेत ड्रग्स विरोधात प्रचंड मोठी कारवाई! गेल्या ५० दिवसांत तब्बल ५० हजार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:29 PM2024-02-07T15:29:01+5:302024-02-07T15:29:38+5:30
'युकथिया' अभियानाअंतर्गत कारवाई, शब्दाला सिंहली भाषेत विशेष अर्थ - काय ते जाणून घ्या
Sri Lanka fights against Drugs: श्रीलंका अनेक वर्षांपासून अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे हैराण आहे. पण आता तिथल्या सरकारनेच याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. या अंतर्गत श्रीलंकासरकारने मोठी कारवाई केली असून, गेल्या ५० दिवसांपासून तेथे एक मोहीम राबवली जात आहे. ‘युकथिया’ असे या मोहिमेचे नाव आहे, ज्याचा सिंहली भाषेतील अर्थ 'न्याय' असा होतो. या मोहिमेअंतर्गत गेल्या ५० दिवसांत ५० हजारांहून अधिक ड्रग्ज विक्रेते आणि गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय लाखो रुपयांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या लोकांपैकी ९८ टक्क्यांहून अधिक लोक हे अंमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित आहेत. तर ६ हजारांहून अधिक लोक आधीच गुन्हेगारांच्या यादीत होते.
युकथिया मोहीम १७ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली. ती संपवण्याची अंतिम मुदत ३० जून निश्चित करण्यात आली आहे. या कारवाईबाबत श्रीलंका पोलीस दररोज तपशीलवार निवेदन जारी करत आहेत. या कारवाईची माहिती जनतेला देण्यासाठी पोलिसांनी हॉटलाइनही तयार केली आहे. आता सरकार या मोहिमेद्वारे देशातून अंमली पदार्थांचा व्यापार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण असे असले तरी त्यांना जगभरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. समीक्षकांनी हा प्रकार मानवाधिकार उल्लंघनाचा भाग असल्याचे म्हटले आहे.
निषेध करूनही ऑपरेशन सुरूच
युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स, लोकल ह्युमन राइट्स कमिशन, लॉयर्स कलेक्टिव्ह इत्यादी इतर अनेक अधिकार गटांकडून निषेध करूनही हे ऑपरेशन सुरूच आहे. या गटांनी असा आरोप केला आहे की श्रीलंका सरकार ड्रग्सच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य धोरणांचा वापर करू शकले असते परंतु त्याऐवजी ते अमानवी पद्धतीने ही प्रक्रिया हाताळत आहेत. असाही आरोप आहे की 17 डिसेंबरपासून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांपैकी काही आजारी आहेत तरीही त्यांना कोठडीच ठेवून त्यांचा छळ केला जात आहे. अनेक आरोप होऊनही श्रीलंका सरकार सध्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे.