Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:27 PM2019-04-22T16:27:05+5:302019-04-22T16:29:35+5:30
कोलंबो - रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी केली आहे.
कोलंबो - रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी केली आहे. आज रात्री मध्यरात्रीपासून श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू होणार आहे.
रविवारी जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात 290 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. आज मध्यरात्रीपासून ही आणीबाणी लागू होणार आहे. दरम्यान, या बॉम्बस्फोटांप्रकरणी श्रीलंकन सरकारने प्रथमच एका संघटनेला जबाबदार धरले आहे. श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा श्रीलंकन सरकारचे प्रवक्ते राजीथा सेनारत्ने यांनी केला आहे.
Reuters: Sri Lankan President Maithripala Sirisena to declare nationwide emergency from midnight on Monday following Easter Day blasts pic.twitter.com/41qoYo1HqU
— ANI (@ANI) April 22, 2019
श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने सोमवारी मध्यरात्रीपासून देशात आणीबाणी लागू करण्याची शिफारस केली होती. एकापाठोपाठ एक झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर देशाला पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. ही संचारबंदी सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत लागू राहील.
दरम्यान. बॉम्बस्फोटांचा तपास करण्यासाठी राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विजित माललगोडा यांचा समावेश आहे. राष्ट्रपतींनी या समितीला बॉम्बस्फोटाच्या सर्व प्रकरणांची दोन आठवड्यांमध्ये चौकशी करून दोन आठवड्यांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली होती. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान, या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.