कोलंबो - भारताने व्यक्त केलेल्या चिंतेकडे दुर्लक्ष करत श्रीलंकेने वादग्रस्त चिनी जहाजाला आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. हे चिनी जहाज श्रीलंकेतील बंदरावर येताना हे जहाज वाटेतील भारतीय संस्थांची हेरगिरी करेल, असा आक्षेप घेत भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती.
चीनची बॅलेस्टिक मिसाईल आणि उपग्रह टेहेळणी जहाज युआन वांग ५ ला ११ ऑगस्ट रोजी हंबानटोटा बंदरात पोहोचायचे होते. तसेच १७ ऑगस्टपर्यंत तिथेच थांबणार होते. १२ जुलै रोजी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिनी जहाजाला हंबानटोटा बंदरामध्ये उभे करण्यास परवानगी दिली होती. मात्र भारताने घेतलेल्या आक्षेपानंतर ८ ऑगस्ट रोजी मंत्रालयाने कोलंबोस्थिती चिनी दूतावासाला पत्र लिहून जहाजाच्या प्रस्ताविक डॉकिंगला स्थगित करण्याची विनंती केली होती.
मात्र आता श्रीलंकेच्या बंदरांचे प्रमुख निर्मल पी. सिल्व्हा यांनी सांगितले की, त्यांनी १६ ते २२ ऑगस्टपर्यंत हंबानटोटा येथे जहाजाला बोलावण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. सिल्व्हा यांनी एएफपीला सांगितले की, आज मला राजकीय परवानगी मिळाली आहे. आम्ही बंदरावर रसद सुनिश्चित करण्यासाठी जहाजाकडून नियुक्त स्थानिक एजंटसोबत काम करू. हंबानटोटा बंदर हे त्याच्या भौगोलिक स्थानामुळे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. या बंदराचे बांधकाम हे चीनच्या मदतीने करण्यात आले आहे.
भारताने हिंदी महासागरामध्ये चीनच्या लष्करी जहाजाच्या प्रवेशाबाबत नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली होती. तसेच याआधीही श्रीलंकेकडे अशा प्रकारांबाबत आक्षेप नोंदवलेला होता. २०१४ मध्ये श्रीलंकेने चीनच्या एक अणु पाणबुडीला बंदरात थांबण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर भारत आणि श्रीलंकेतील संबंध बिघडले होते.