हसत्या खेळत्या माणसांना जिवाच्या भीतीनं पळायला भाग पाडतं, एका रात्रीत ‘शरणार्थी’ बनवतं ते युद्ध. राजकीय पटलांवर आणि अस्मितांच्या टोकदार पटांवर जी मांडणी व्हायची ती होतच असते मात्र त्यात चारचौघांसारखा सामान्य माणूस देशोधडीला लागतो. काळ कोणताही असो, युद्ध माणसांची हीच गत करतं..तेच आज आर्मेनिया आणि अझरबैजानच्या युद्धात दिसतं आहे. १९९० पासून हा प्रदेश अशांत आहे; पण गेल्या २७ सप्टेंबरला युद्धाला तोंड फुटलं आणि हसतीखेळती शहरं आडवी झाली. माणसं जिवाच्या भीतीनं दुसऱ्या देशात आश्रयाला पळू लागली. आणि या साऱ्यात स्टेपनेकर्ट हे शहर बेचिराख होत आहे. रस्त्यावर येऊन पडलेले, मातीत रुतलेले न फुटलेले रॉकेट्स, पडलेल्या इमारती, सिमेंटमातीचा चिखल यातून वाट काढत जिवाच्या भीतीने माणसं घाबरून कुठंकुठं लपत आहेत.आर्मेनिया आणि अझरबैजानच्या फौजा एकमेकांना भिडल्या आहेत, रॉकेट हल्ले होत आहेत आणि त्या साऱ्याला लागून असलेलं, आंतरराष्ट्रीय सीमेवरचं आर्टसख रिपब्लिकचं हे मोठं शहर, स्टेपनेकर्ट. त्या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता नसली तरी हे शहर मात्र शांत, सुंदर असं. ते आता होरपळत आहे. तिथं न फुटलेले रॉकेट्स, त्यांचा मारा, त्यामुळे घरं कोसळणं यांचं चक्र सुरू झालं आहे. रस्त्यावर फळांचे सडे पडलेत, जे हातात आहे ते टाकून माणसं बाजारातून जीव वाचवत पळालेली दिसतात. आर्मेनिया आणि अझरबैजान दोन्हीकडच्या फौजा मानवी आणि संसाधन नुकसानासाठी परस्परांना जबाबदार धरतात. मात्र स्टेपनेकर्ट त्यात जीव मुठीत धरून जगतं आहे. हे शहर डाळिंब, व्होडका आणि जांगिल नावाच्या स्थानिक हर्ब ब्रेडसाठी फार प्रसिद्ध. एरव्ही निवांत, शांत, हसरं शहर. त्या शहरातही अनेक आर्मेनियन शरणार्थी आता दाखल होत आहेत, युद्धानं शहराचा नूर बदलला आहे. सतत होणारा तोफगोळ्यांच्या माºयात हे शहर आपली रौनक तर हरवून बसलंच; पण सामसूम, रिकाम्या घरांचे पडके भुताचे वाडे असावे तसं भासू लागलं आहे.तीन दिवसांपूर्वीपर्यंत या शहरातलं जगणं कुठल्याही शहरात असतं तसंच होतं. सीमेपलीकडे युद्ध पेटलेलं होतं; पण त्याचा थेट परिणाम या शहरावर झालेला नव्हता. मात्र या शहराचे आर्मेनियाशी मायेचे संबंध. त्यामुळे इथे आता साधारण ५५ हजारांच्या आसपास आर्मेनियन शरणार्थी दाखल झाल्याची आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाची माहिती सांगते. शहरातले बाजार बंद झाले, काही इमारती कोसळल्या, अनेक दुकानांच्या खिडक्या पडल्या, फुटल्या आणि सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत.या शहरातली माणसं सांगतात की, सोव्हिएट काळातल्या आठवणी पुन्हा जागा झाल्या आहेत. जागोजागी मिल्ट्रीच्या गाड्या, कुठे पेटती इमारत, जळालेली वाहनं, पडझड झालेल्या भकास इमारती हे सारं चित्र त्याकाळातही दिसायचं. आता इतक्या वर्षांनंतर त्या काळाचं भूत पुन्हा जागं झाल्यासारखं हे शहर भकास आणि भयाण दिसू लागलं आहे. विशेषत: सत्तरी, ऐंशी पार केलेले ज्येष्ठ नागरिक हे हल्ले पाहून फार धास्तावले आहेत. एकेकाळी सोव्हिएट रशियातून वेगळं होण्याच्या काळात त्यांनी हे बॉम्बिंग अनुभवलं आहे. त्याकाळी जिवाच्या भीतीनं कुठंकुठं लपणं आणि आज पुन्हा राहत्या घरावर रॉकेटचा मारा होणं, जीव दडवून कशाखाली तरी लपणं, टोकदार वस्तू निवडत त्या पायाखालून बाजूला करणं हे सारं इथल्या ज्येष्ठांना पुन्हा करावं लागतं आहे. सकाळ होताच तोफगोळ्याचा मारा कमी झाला, सायरन थांबले, की आपल्या जिवाभावाच्या माणसांचं काय झालं हे पाहण्यासाठी काही माणसं सुसाट वेगानं गाड्या काढून निघून जातात. काही सुरक्षित ठिकाणी रवाना होतात, काही मात्र सरकारी शेल्टरमध्ये जाऊन आसरा घेतात. लेकराबाळांच्या खाण्याची काय सोय एवढाच महत्त्वाचा प्रश्न त्यांना छळत असतो. सायंकाळ होता होता पुन्हा सायरन वाजतात, लोक शेल्टरमध्ये लपतात आणि आपला जीव वाचला याबद्दल आभार मानतात.. युद्ध माणसांच्या जगण्यावर असं दहशतीचं सावट धरतं, आणि कोण चूक कोण बरोबर या राजकीय हिशेबात काही जण कायमचं हसणं विसरून जातात..
दोन देशांमधल्या युद्धाच्या कात्रीत सापडलेल्या निवांत शहराची भकास गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 5:51 AM