प्रश्न - मी गेल्या आठवड्यात चेन्नईत माझ्या काकींकडे गेले होते, तेव्हा माझा वैध अमेरिकन व्हिसा असलेला पासपोर्ट हरवला. याची माहिती मी अमेरिकन वकिलातीला द्यावी का? त्यासाठीची प्रक्रिया काय असते?
उत्तर - होय, याबद्दलची माहिती तुम्ही शक्य तितक्या लवकर द्यायला हवी. व्हिसा हरवल्याची माहिती देणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हिसा रिप्लेस करायचा असल्यास त्यासाठी हे पाऊल आवश्यक ठरतं. यासाठीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
सर्वप्रथम तुम्ही याबद्दलची तक्रार ज्या भागात घडली, तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात द्या. नेमकं काय घडलं, याची तक्रार लेखी स्वरूपात नोंदवा.
पोलीस तक्रार केल्यावर याची माहिती तुम्हाला व्हिसा दिलेल्या अमेरिकन दूतावास किंवा वकिलातीला द्या. जर तुम्हाला नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने किंवा भारतातील अमेरिकन वकिलातीने व्हिसा दिला असल्यास supportindia@ustraveldocs.com वर ईमेल करा. मेलमध्ये तुमची बेसिक माहिती (नाव, जन्म तारीख आणि स्थळ, राष्ट्रीयत्व, घरचा पत्ता आणि फोन नंबर), तुम्हाला जिथून व्हिसा मिळाला ते शहर, तुमच्याकडून व्हिसा कधी आणि कसा हरवला याचा उल्लेख करा. हरवलेल्या व्हिसाची आणि तुमची माहिती देणाऱ्या पासपोर्टच्या पानाची प्रत (उपलब्ध असल्यास) पोलीस तक्रारीच्या अहवालासोबत जोडा.
चोरीला गेलेला किंवा हरवलेला अमेरिकन व्हिसा तुमच्या ओरिजनल अर्जाच्या धर्तीवर पुन्हा दिला जाऊ शकत नाही. तुम्हाला अमेरिकेत प्रवास करायचा असल्यास नव्या व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठीची प्रक्रिया तुम्ही www.ustraveldocs.com/in वरून सुरू करू शकता.
एकदा व्हिसा हरवल्याची तक्रार मिळाल्यावर तो आमच्या यंत्रणेकडून रद्द केला जातो. त्यामुळे तुम्ही एकदा व्हिसा हरवल्याची माहिती दिली आणि त्यानंतर तुम्हाला व्हिसा सापडला, तरीही तुम्हाला अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी नवा व्हिसा मिळवावा लागेल.
जर अमेरिकेत प्रवास करत असताना तुमचा पासपोर्ट हरवला, तर काही अतिरिक्त पावलं उचलावी लागतील. याची माहिती तुम्हाला तुमच्या देशाच्या स्थानिक दूतावसाला किंवा वकिलातीला द्यावी लागेल आणि रिप्लेसमेंट पासपोर्ट मिळवावा लागेल. यानंतर अरायव्हल-डीपार्चर कागदपत्र मिळवण्यासाठी I-102 अर्ज (www.uscis.gov/i-102) करावा लागेल. तुमचा पासपोर्ट हरवला असल्यास अमेरिकेत दाखल झाल्याच क्षणी पासपोर्टवरील तुमची माहिती देणाऱ्या पानाची आणि अॅडमिशन स्टॅम्पची एक प्रत तयार करा.