भेदिले पृथ्वीमंडळा...दूध विकणाऱ्या आईच्या मुलाला 'अवकाश'ही झालं ठेंगणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 12:50 PM2019-03-09T12:50:32+5:302019-03-09T12:52:23+5:30
अंतराळात प्रवेश करणारा पृथ्वीतळावरचा पहिला माणूस म्हणून ज्याची नोंद इतिहासात आहे त्या युरीचा जन्म ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात झाला.
9 मार्च 1934 रोजी रशियात जन्म झालेल्या युरी गागरिन बद्दल कोणालाही वाटलं नसेल की, हा मुलगा अंतराळातील गूढ रहस्य उलगडून दाखवण्यात यशस्वी होईल. अंतराळात प्रवेश करणारा पृथ्वीतळावरचा हा पहिला माणूस आहे. युरीचा जन्म ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात झाला. युरीचे वडील सामान्य मजूर आणि आई दूध विकण्याचे काम करत होती. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे युरीला शिक्षण घेण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते, दुसऱ्या महायुद्धावेळी युरी आणि त्याच्या कुटूंबाला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. दोन वर्ष युरी आणि परिवाराला एका छोट्या झोपडीमध्ये वास्तव्य करावं लागलं.
मात्र अशा संघर्षाच्या परिस्थितीतून मार्ग काढत युरीने 1951 मध्ये ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील तांत्रिक शिक्षणासाठी युरीने सेवियत येथे एका स्थानिक विमान प्रशिक्षण संस्थेकडून विमान चालवण्याचे प्रशिक्षण सुरु केले. प्रशिक्षणानंतर सेवियत संघाच्या (आत्ताचे रशिया) एअरफोर्समध्ये नियुक्ती झाली.
12 एप्रिल 1961 मध्ये युरीने व्होस्तोक-1 नावाच्या यानातून पृथ्वीच्या कक्षेबाहेर झेप घेत अंतराळात प्रवेश केला. अंतराळात प्रवेश करणारा पृथ्वी तळावरचा पहिला माणूस हा बहुमान युरीने पटकावला. अंतराळात प्रवेश करण्याची मोहिम किती जोखमीची असू शकेल याची कल्पना युरी गागरिन यांना होती. त्यामुळेच गागरिन यांनी आपल्या कुटुंबियांना या मोहिमेबाबत कोणतीही कल्पना दिली नाही.
अंतराळातील या मोहिमेतून परत येण्याचीही कोणतीच खात्री युरी गागरिन यांना नव्हती. एक क्षण असाही आला ज्यावेळी युरी गागरिन यांच्या यानाला आग लागण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र युरी यांच्या धाडसाने आणि चाणाक्ष बुद्धीने तब्बल 108 मिनिटे त्यांचे यान अंतराळात फिरत राहिले. पृथ्वीतळावरील अंतराळात जाणारा पहिला माणूस युरी गागरिन यांची इतिहासात नोंद आहे.
27 मार्च 1968 रोजी गागरिन मिग १५ यूटीआय’ या विमानाची चाचणी घेत असताना त्यांचा आणि गागरिन यांच्या सहकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. गागरिन यांच्या अंतराळातील मोहीमेनंतर नासा यांचे धाडस वाढले अन् तीन आठवड्यानंतर अमेरिकेचे एलन शेफर्ड यांनी अंतराळ मोहिम फत्ते केली.