लंडन- पाच दिवसांच्या ब्रिटेनच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानकपणे स्वतःच्या कार्यक्रमात बदल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीकडे रवाना झाले आहेत. मोदी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची भेट घेणार आहेत. या दौ-यात मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान खाकान अब्बासी यांची भेट न घेतल्यानं तो चर्चेचा विषय ठरला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रमंडळ देशांच्या प्रमुखांच्या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांची भेट घेण्याचं टाळलं. तसेच आता मोदी शाहिद खाकान अब्बासी यांची भेट घेण्याचीही शक्यता फारच कमी आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोगममधल्या राष्ट्रमंडळ देशांच्या प्रमुखांच्या परिषदेत सहभाग घेण्यासाठी चार दिवसांच्या ब्रिटेनच्या दौ-यावर गेले होते. भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी गेल्या वेळी डिसेंबर 2015मध्ये भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तान दौ-यावरून परतताना लाहोरला अचानक जाऊन पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतल्यानं तो चर्चेचा विषय ठरला होता.
जानेवारी 2016मध्ये पठाणकोट दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर सप्टेंबर जम्मू-काश्मीरमध्ये उरी येथे लष्कराच्या एका तुकडीवर दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमालीचा वाढला. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं लंडनमध्ये भारतीय झेंडा फाडल्याच्या प्रकाराचाही निषेध नोंदवला आहे. भारतानं ही घटना गांभीर्यानं घेतली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार म्हणाले आहेत. तसेच ब्रिटेननं झाल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त केलं. आम्हाला आशा आहे की, या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करत दोषींना शिक्षा होईल, असं रवीशकुमार म्हणाले आहेत.