पाच जणांच्या कुटुंबाने केला आत्मघाती हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:47 AM2018-05-15T06:47:59+5:302018-05-15T06:47:59+5:30
इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबाया स्थित पोलीस मुख्यालयावर पाच जणांच्या एका कुटुंबाने आत्मघाती हल्ला केला.
सुराबाया : इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबाया स्थित पोलीस मुख्यालयावर पाच जणांच्या एका कुटुंबाने आत्मघाती हल्ला केला. यात एका मुलाचाही समावेश आहे. एका अन्य कुटुंबाने चर्चेवर केलेल्या हल्ल्याला काही तास उलटत नाहीत तोच हा दुसरा हल्ला झाल्याने इंडोनेशिया हादरले आहे.
चर्चवरील हल्ल्यांची जबाबदारी इसिसने घेतली आहे. यामुळे या संघटनेचा दक्षिणपूर्व आशियात प्रभाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आगामी तीन महिन्यात इंडोनेशियात आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
या देशावर दीर्घ काळापासून अतिरेक्यांचा प्रभाव राहिलेला आहे. २००२ मध्ये बालीमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात २०० जण मृत्युमुखी पडले होते. यात बहुतांश विदेशी पर्यटक होते. त्यानंतर सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरुद्ध मोहिम उघडली होती. शेकडो अतिरेक्यांना अटक केली होती. अनेक अतिरेकी नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. अलीकडच्या हल्ल्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, रविवारी दोन मुलांसह सहा जणांच्या एका कुटुंबाने सुराबायामध्ये सकाळच्या प्रार्थनेनंतर चर्चवर आत्मघातकी हल्ला केला. यात हल्लेखोरांसह १८ जण मारले गेले. चर्चवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्यात सहभागी व्यक्ती जेएडीचा स्थानिक नेता आहे. हा समूह इसिसचा समर्थक आहे. दुसरे आत्मघाती कुटुंबही या समूहाशी जोडलेले आहे. कार्नावियान म्हणाले की, जेएडीच्या नेतृत्वाला झालेली अटक हे हल्ल्याचे कारण असू शकते. (वृत्तसंस्था)
।नेमके काय झाले?
येथे सोमवारी एका अन्य कुटुंबाने शहरातील पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वत:ला उडवून दिले. यात १० जखमी झाले आहेत. राष्ट्रीय पोलीस प्रमुख टीटो कार्नावियान म्हणाले की, दोन दुचाकींवर पाच लोक आले होते. यात एक लहान मुलगाही होता.
या हल्लेखोर कुटुंबातील एक ८ वर्षांची मुलगी बचावली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, पण तिची आई, वडील आणि दोन भाऊ यांचा मृत्यू झाला.