ट्रम्प यांची मुस्लिम देशांवरील प्रवासबंदी योग्यच- सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 08:07 AM2018-06-27T08:07:29+5:302018-06-27T08:16:38+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मुस्लिम देशांच्या नागरिकांवर लादलेली प्रवेशबंदी योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मुस्लिम देशांच्या नागरिकांवर लादलेली प्रवेशबंदी योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प सरकारचा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी टि्वटरवर ‘वॉव’ असे लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांच्या या मुस्लिम देशांच्या नागरिकांवरील प्रवासबंदीवर जोरदार टीका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही प्रवास बंदी योग्य ठरविल्यामुळे आता हा वाद संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ट्रम्प यांच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती. ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे अमेरिकेत प्रवासबंदीच्या इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन होते किंवा अमुक एका धर्मावर अन्याय केला जातोय हे सिद्ध होऊ शकलेले नसल्याचं स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांचा निर्णय योग्य ठरविला.
SUPREME COURT UPHOLDS TRUMP TRAVEL BAN. Wow!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 26, 2018
मुस्लिम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवास करण्यास बंदी घालणारा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत डेमोक्रॅटिक खासदार व मानवाधिकार संघटनांनी त्यावर टीका केली होती. तथापि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय ५ विरुद्ध ४ मतांनी योग्य ठरविला.