लाखो अफगाणींचा डेटा लीक? अमेरिकेने केला होता गोळा, तालिबान्यांकडून वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:20 AM2021-08-29T09:20:45+5:302021-08-29T09:27:36+5:30
afghanistan data leak : तालिबानला लाखो अफगाणी नागरिकांचा डेटा मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. हा डेटा एकेकाळी अमेरिकेने जमा केला होता.
एकीकडे अमेरिका २० वर्षांनंतर अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे अनेक नागरिक आणि सैनिकही परतले आहेत. मात्र, निघण्यापूर्वी अमेरिकेने तालिबानला इतके ताकदवान बनवले आहे की, येत्या काही दिवसांत सामान्य अफगाण नागरिकांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, आता तालिबानला लाखो अफगाणी नागरिकांचा डेटा मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. हा डेटा एकेकाळी अमेरिकेने जमा केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानच्या स्पेशल युनिट Al Isha ने हे काम सक्रियपणे पार पाडायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने एकेकाळी वापरलेला प्रत्येक डेटा या स्पेशल युनिटकडून गोळा केला जात आहे. ब्रिगेड कमांडर नवाजुद्दीन हक्कानी यांनी एका न्यूज पोर्टलला याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Al Isha द्वारे बायोमेट्रिक स्कॅनर वापरले जात आहे, जे यापूर्वी अमेरिकन लष्कराने वापरले होते. याद्वारे अमेरिकन लष्कर आणि NATO बरोबर कोणी काम केले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य अफगाण नागरिक आणि काही अधिकाऱ्यांना याबाबत आता भीती वाटत आहे. तालिबानशी संबंधित गुप्त माहिती ज्यांच्या वतीने अमेरिकेला देण्यात आली आहे, अशा २० वर्षांपासून अमेरिकन लष्करासाठी काम केलेल्या सर्वांचा आता जीव धोक्यात आला आहे.
ब्रिगेड कमांडर नवाजुद्दीन हक्कानी यांनीही आपल्या वक्तव्याद्वारे याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता काबूल ताब्यात घेण्यात आले आहे, तेव्हा संपूर्ण लक्ष प्रतिबुद्धिमत्तेवर केंद्रित आहे. Al Isha युनिटने हे काम आधीच सुरू केले आहे. सध्या डेटा स्कॅन केला जात आहे.
काय आहे हाइड?
अफगाणिस्तानात जोपर्यंत अमेरिकी लष्कर सक्रिय भूमिका बजावत होते, तोपर्यंत हाइड नावाचे उपकरण त्यांच्यावतीने सतत वापरले जात होते. हाइड म्हणजे हँडहेल्ड इंटरएजन्सी आयडेंटिटी डिटेक्शन इक्विपमेंट. या माध्यमातून अमेरिकेने जवळपास १५ लाख अफगाण नागरिकांचा डेटा गोळा केला होता. यामध्ये डोळ्यापासून चेहऱ्याच्या स्कॅनपर्यंत बरेच काही होते. हाइडच्या माध्यमातून अमेरिकेने प्रत्येक अफगाण व्यक्तीची ओळख पटवली होती, ज्यांनी अमेरिकेला मदत केली. तसेच, तालिबान लपलेले ठिकाणही उघड केले होते.
आता असे म्हटले जात आहे की, हीच हाइड तालिबानांच्या हाती लागली आहे. ते आपल्या मोहिमेला धार देण्यासाठी त्याचा वापर करणार आहेत. हक्कानी यांच्या मते, Al Isha युनिट अलीकडच्या काळात खूप मोठी झाली आहे. एक हजाराहून अधिक लोक येथे काम करत आहेत. अशा प्रकारे डेटा गोळा केला जात आहे.