काबुल: 5 वर्षांपासून पडद्याआड राहून आपल्या दहशतवादी संघटनेला शक्तिशाली बनवणारा तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा पहिल्यांदाच जगासमोर आला. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मृत्यू झाल्यानंतर 2016 मध्ये अखुंदजादा तालिबानचा प्रमुख झाला. तालिबानच्या अधिका-यांनी रविवारी सांगितले की, अखुंदजादाने दक्षिण अफगाणिस्तानच्या कंदाहार शहरात आपल्या समर्थकांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले.
मृत्यूच्या अफवा उठल्या
तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादा याने पहिल्यांदाच सार्वजनिकपणे हजेरी लावली आहे. अखुंदजादा 2016 पासून तालिबानच्या इस्लामी चळवळीचा आध्यात्मिक प्रमुख होता आणि तो लोकांच्या नजरेतून गायब राहायचा. ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला, तेव्हाही अखुंदजादा जगासमोर आला नाही. यानंतर त्याच्या मृत्यूच्या अफवा उठल्या होत्या. पण, आता तो जिवंत असल्याचं सिद्ध झालं आहे.
ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आलेहैबतुल्ला अखुंदजादा हा आतापर्यंत लो प्रोफाइल होता, त्यामुळे तालिबान सरकारमधील त्याच्या भूमिकेवर प्रश्नही उपस्थित झाले होत. तालिबानी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अखुंदजादा शनिवारी दारुल उलूम हकीमा मदरसामध्ये तालबानच्या सैनिक आणि शिष्यांशी बोलण्यासाठी पोहोचला होता. कार्यक्रमाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती आणि कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ समोर आले नाहीत. पण दहा मिनिटांचे ऑडिओ रेकॉर्डिंग तालिबानच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे.
ऑडिओमध्ये अखुंदजादा काय म्हणाला?
अखुंदजादाला अमिरुल मोमिनीन किंवा निष्ठावंतांचा सेनापती म्हणतात. ऑडिओमध्ये तालिबानचा सर्वोच्च नेता धार्मिक संदेश देताना दिसला. या मेसेजमध्ये राजकारणाबाबत कोणतीही चर्चा नव्हती. पण तालिबानच्या नेतृत्वासाठी प्रार्थना मागितल्या गेल्या. तालिबानमधील शहीद आणि जखमी झालेल्या सैनिकांसाठी त्यांनी प्रार्थना केली. यासोबतच या मोठ्या परीक्षेत इस्लामिक अमिरातच्या अधिकाऱ्यांच्या यशासाठी प्रार्थनाही करण्यात आली.