काबुल:अफगाणिस्तानाततालिबाननं ताबा मिळवल्यानंतर पाकिस्ताननं तालिबानला उघडपणे पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या विरोधात काबुल ते वॉशिंग्टनपर्यंत निदर्शनं होत आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, मंगळवारी काबुलमध्येही पाकिस्तान विरोधातील निदर्शनं सुरू होती. यादरम्यान, या नागरिकांवर तालिबानकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात अनेक महिला आणि मुलं जखमी झाल्याची माहिती आहे.
पंजशीर युद्धात तालिबानकडून पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामुळे आणि आयएसआय प्रमुख फैज हमीदच्या काबुल भेटीमुळे अफगाणी संतापले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही हा मुद्दा मोठा झाला असून, विविध भागातून यावर टीका करण्यात येतीय. यामुळेच, अफगाणिस्तानचे नागरिक काबुलमध्ये ठिकठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात निदर्शनं करत आहेत. अफगानिस्तानच्या विविध शहरांमध्ये महिला गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या हक्कांसाठी निदर्शनं करत असली आहेत. याशिवाय काबुलपासून अमेरिकेच्या वॉशिंग्टनपर्यंत अनेक शहरात रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत.
नॅशनल रेझिस्टन्स फोर्स (NRF) म्हणजेच नॉर्दर्न अलायन्सचे पंजशीरमध्ये नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूदने म्हटले की, पंजशीरवर पाकिस्तानचा हवाई दल सतत हल्ले करत आहे. पंजशीर जिंकण्यासाठी पाकिस्तानकडून तालिबानला मदत केली जात आहे. आता आपली खरी लढाई पाकिस्तानशी असून, पाकिस्तान लष्कर आणि ISI युद्धात तालिबानचे नेतृत्व करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय.