अफगाणिस्तानमध्ये पुन्हा लागू झाले तालिबानी कायदे, पुरुष-महिलांसाठी असे आहेत कठोर नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 12:59 PM2021-07-02T12:59:45+5:302021-07-02T13:00:13+5:30
Taliban laws re-enforced in Afghanistan: देशातील ८० टक्के जिल्ह्यांवर आपला कब्जा झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या पुनरागमनाबरोबरच काळे तालिबानी कायदेही परत आले आहेत.
काबून - अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केल्यापासून या देशात पुन्हा एकदा तालिबानने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. तालिबानी हल्लेखोरांनी पुन्हा एकदा तीव्र हल्ल्यांचे सत्र सुरू केले असून, देशातील ८० टक्के जिल्ह्यांवर आपला कब्जा झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या पुनरागमनाबरोबरच काळे तालिबानी कायदेही परत आले आहेत. तालिबाबने आपल्या नियंत्रणात असलेल्या देशातील तखार प्रांतात महिलांना एकट्याने घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे, तर पुरुषांना दाढी राखणे अनिवार्य केले आहे. (Taliban laws re-enforced in Afghanistan, strict rules for men and women)
पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूज ने मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या हवाल्याने सांगितले की, तालिबाबने तरुणींना हुंडा देण्याबाबतही नवे नियम बनवले आहेत. तखारमध्ये राहणारे सिव्हिल सोसायटीचे कार्यकर्ते मेराजुद्दीन शरिफी यांनी सांगितले की, तालिबानने महिलांना पुरुष सोबत असल्याशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. दरम्यान, तालिबान कुठल्याही पुराव्यांविना सुनावणी करण्यावर भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तखार प्रांतीय परिषदेने सांगितले की, ज्या भागांवर तालिबानचा कब्जा झाला आहे तिथे खाद्यपदार्थांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांनी सांगितले की, तालिबानी नियंत्रणाखाली असलेल्या भागातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिथे सेवा देण्यासाठी कुणी जात नाही, रुग्णालये आणि शाळा बंद पडल्या आहेत. तखार प्रांताचे गव्हर्नर अब्दुल्ला कारलुक यांनी सांगितले की, सरकारी इमारतींना तालिबानने नष्ट केले आहे. या परिसरातील सर्व सेवा बंद झाल्या आहेत. तालिबानने सर्व काही लुटले आहे. आता तिथे कुठलीही सेवा शिल्लक राहिलेली नाही.
तर स्थानिकांनी सांगितले की, या प्रांतात अशाप्रकारची परिस्थिती कायम राहणे अस्वीकार्य आहे. तालिबानच्या बीमोडासाठी प्रांतामध्ये अभियान सुरू करण्यात आले पाहिजे. मात्र तालिबाबने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच तालिबानविरोधात अपप्रचार केला जात असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान, तालिबान आणि अफगाण सैन्यामध्ये हेरात, कपिसा, तखार, बाल्ख, परवान, बघलान आदी प्रांतांमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, गेल्या २४ तासांमध्ये १० प्रांतात तालिबानचे २५० हल्लेखोर मारले गेले. दुसरीकडे अमेरिकी सैन्याने सुमारे दोन दशके चाललेल्या संघर्षानंतर बगराम विमनातळ सोडण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना हा विमानतळ तालिबान आणि अल कायदाविरोधातील संघर्षामधील अमेरिकी कारवाईचा प्रमुख केंद्र होता.