Islamic Emirate of Afghanistan: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद (Zabihullah Mujahid) याला देशाच्या सांस्कृतिक आणि सूचना मंत्रिपदी नियुक्त केलं आहे. याच मुजाहिदनं काल तालिबान्यांकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करुन जगासमोर तालिबानची भूमिका स्पष्ट केली होती. (Taliban spokesman zabiullah mujahid appointed as minister of culture and information afghanistan)
जबीहुल्लाह मुजाहिद यानं काल माध्यमांसमोर तालिबान्यांची भूमिका स्पष्ट करताना अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार नेमकं कसं असेल याची माहिती दिली होती. यात इस्लामी नियमांचं पालन करुन महिलांच्या अधिकारांचा सन्मान केला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तसंच आपला विरोध करणाऱ्या सर्वांना माफ केलं असून आमचं आता कुणाहीसोबत शत्रुत्व नाही असंही म्हटलं होतं.
तालिबान आता बदलला आहे हेच त्यांनी पत्रकार परिषदेतून जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही जबीहुल्लाह यांनी उत्तरं दिली होती. जबीहुल्लाह मुजाहिद गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच कॅमेरासमोर आला होता.
जबीहुल्लाह मुजाहिद यानं पत्रकारांना अतिशय शांतपणे दिलेली उत्तरं पाहून अनेकांना धक्का बसला होता. रक्तपात आणि हिंसक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तालिबानचं अचानक शांतीप्रिय स्वरूप पाहून अनेकांना धक्का बसला. ज्या खुर्चीवर अफगाणिस्तान सरकारमधील माहिती व प्रसारण मंत्री पत्रकार परिषद घेत असत त्याच खुर्चीवर बसून मुजाहिद यांनं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती.