तालिबानी सैतानांचा रक्तपात!
By admin | Published: December 17, 2014 05:09 AM2014-12-17T05:09:06+5:302014-12-17T05:09:06+5:30
पाकिस्तानातील सत्ता उलथून टाकून इस्लामी सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधलेल्या ‘तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’च्या सैतानांनी मंगळवारी लष्करातर्फे चालविल्या जाणा-या पेशावरमधील एका शाळेत रक्तपात घडवला.
पेशावर : पाकिस्तानातील सत्ता उलथून टाकून इस्लामी सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधलेल्या ‘तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’च्या सैतानांनी मंगळवारी लष्करातर्फे चालविल्या जाणा-या पेशावरमधील एका शाळेत रक्तपात घडवला. या हल्ल्यात १३२ विद्यार्थी, ९ कर्मचारी असे एकूण १४१ जण ठार व १३० जण जखमी झाले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या अमानुष हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी धिक्कार केला. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ व लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी या
राक्षसी श्वापदांचा संपूर्ण नि:पात करण्याचा निर्धार जाहीर केला.
सर्व सैतान ठार : शाळेत घुसलेल्या सर्व सहाही सशस्त्र अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, आणखी एक अतिरेकी आत्मघाती स्फोटात ठार झाल्याचे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते ले. ज. असीम बाजवा यांनी सांगितले.
प्रतिहल्ले सुरू : हल्लेखोरांच्या पाठीराख्यांचा बीमोड करण्यासाठी लष्कराने तालिबानचे प्राबल्य असलेल्या खैबर खिंडीच्या परिसरातील भागावर लगेच हवाई हल्ले सुरू केले आहेत.
या राक्षसी श्वापदांविरुद्धचा आमचा लढा दुप्पट जोमाने सुरूच राहील व त्यांचा पूर्ण खात्मा केल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही. या हल्ल्याने त्यांनी देशाच्या मर्मावर आघात केला आहे; पण त्याने देशाचे मनोधैर्य जराही खच्ची होणार नाही.
जनरल राहील शरीफ,
लष्करप्रमुख पाकिस्तान
> पेशावरमधील लष्करी छावणीजवळ असलेल्या या शाळेत मागील बाजूच्या स्मशानभूमीतून लष्करी गणवेश केलेले सहा अतिरेकी सकाळी १०.३० च्या सुमारास घुसले. त्या वेळी शाळेत सुमारे एक हजार विद्यार्थी व शिक्षक होते. शाळेच्या वर्गांमध्ये शिरून अतिरेक्यांनी आपल्याकडील रायफलींमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जे कोणी त्यांच्या गोळीबाराच्या पट्ट्यात आले त्यांची कलेवरे शाळेच्या आवारात इतस्तत: विखुरली गेली.
> थोड्याच वेळात पाकिस्तानी लष्कराच्या कमांडो तुकड्या शाळेत घुसल्या व त्यांनी एकीकडे अतिरेक्यांना रोखून धरीत जीव मुठीत धरून बसलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना बाहेर काढले. या धुमश्चक्रीनंतर हे भयनाट्य संपले; पण तोवर १००हून अधिक विद्यार्थ्यांसह १४१ जणांचा बळी गेला होता. शाळेबाहेर व इस्पितळांत आक्रोश करणाऱ्या पालकांची दृश्ये काळजाचे पाणी करणारी होती. मृतांमधील बहुतांश १० ते २० या वयोगटातील असल्याचे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले. मरण पावलेले सर्वजण अतिरेक्यांच्या गोळ््यांचे लक्ष्य ठरले की अतिरेकी व लष्कर यांच्यातील धुमश्चक्रीत सापडल्याने त्यातील काहींना प्राणास मुकावे लागले, हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.
> हल्ल्यात हकनाक मारल्या गेलेल्या १४ वर्षांच्या अब्दुल्ला नावाच्या मुलाचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी लेडी हार्डिंग्ज इस्पितळात आलेल्या ताहीर अलींनी हंबरडा फोडला व छाती बडवून घेत ते म्हणाले, ‘‘माझा मुलगा सकाळी गणवेश घालून शाळेत गेला होता. आता तो शवपेटीत आहे. माझा मुलगा हे माझे स्वप्न होते. माझ्या स्वप्नाचाच खून झाला आहे!’’
> हल्ल्यातून बचावलेल्या आमीर मतीन या विद्यार्थ्याने सांगितले की, गोळीबार थोडा वेळ थांबला तेव्हा लष्करी जवान आमच्या मदतीला धावून आले. जवानांनी आम्हाला वर्गाबाहेर काढले, तेव्हा आमचे अनेक मित्र बाहेर मरून पडलेले आम्ही पाहिले. काहींना तीन तर काहींना चार गोळ््या लागलेल्या होत्या.