इराणसोबतच्या तणावामध्ये वाढ होत असून अमेरिकेने पहिल्यांदाच कतारमध्ये रडारपासून लपून राहणारी एफ-22 ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. शुक्रवारी अमेरिकेच्या हवाई दलाने एफ-22 'रॅप्टर स्टेल्थ’ ही लढाऊ विमाने तैनात केल्याची माहिती दिली.
कतारमध्ये किती विमाने तैनात केली आहेत याबाबतचा आकडा अद्याप देण्यात आलेला नाही. मात्र, एका फोटोमध्ये कतारच्या अल उदीदच्या हावाईतळावर पाच विमाने उड्डाण करताना दिसली आहेत. यापूर्वी अमेरिकेने मे मध्ये खाडी क्षेत्रामध्ये अणुबॉम्ब वाहून नेणारी बी-52 विमाने तैनात केली होती.
एका संरक्षण अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, लढाऊ विमाने मध्य पूर्वमध्ये तैनात करणे हे नवीन सैन्याच्या तैनातीचा भाग आहेत. याचा उद्देश पूर्ण परिसर, खासकरून इराक, सिरियामध्ये अमेरिकेच्या सैन्याला संरक्षण देण्यासाठी अमेरिकेची ताकद वाढविणे आहे. जिथे अमेरिकाइराणसमर्थित दहशतवाद्यांच्या विरोधात लढत आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणी सेना आणि त्यांचे समर्थक या क्षेत्रातील अमेरिकनांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. याबाबतची गुप्त माहिती हाती आली आहे.
इराणसोबत 2015 मध्ये अणू करारातून अमेरिका बाहेर पडल्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका इराणवर कडक प्रतिबंध लावत आहे. मागिल आठवड्यात इराणने अमेरिकेचे ड्रोन विमान पाडले होते. यामुळे तणाव वाढला आहे.