सुरेश एस. डुग्गरजम्मू : देश कारगिल विजयाचा २२वा दिन सोमवारी साजरा करीत असताना लडाखच्या दमचोक भागात अनेक ठिकाणी कथित चिनी नागरिकांनी तंबू उभे केले आहेत. भारताने त्यांना इशारा देऊनही काही फरक पडलेला नाही.
लडाख आघाडीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसाठी चर्चेची बारावी फेरी सोमवारी होणार होती. परंतु, कारगिल विजय दिवस कार्यक्रमामुळे भारतीय लष्कराच्या आग्रहानंतर ती पुढे ढकलली आहे. तोपर्यंत ही शंका आहे की, दमचोकमध्ये तंबू उभारलेले चिनी नागरिक तेथेच राहतील. लष्करी सूत्रांनुसार काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने चिनी नागरिकांनी दमचोकमध्ये घुसखोरी केली आहे. चीनचे लष्कर त्याला घुसखोरी समजत नाही. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांमध्ये जे १० वादग्रस्त भाग आहेत त्यात दमचोक एक आहे. त्यामुळे हे तंबू काढून टाकण्याची सक्तीने कारवाई केली जाऊ शकत नाही.
नागरिकांच्या वेशात सैनिक...अधिकारी दावा करत होते की, तंबू उभे करणाऱ्यांत चिनी नागरिकांशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक नागरिकांच्या वेषांत होते.मिळालेल्या माहितीनुसार याबाबत हाॅटलाइनवर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. परंतु, भारतीय लष्कर सध्या या भागात जाऊ शकत नाही कारण वादग्रस्त क्षेत्रांत गेल्या एक वर्षापासून भारतीय लष्करावर लावलेला ‘प्रतिबंध’ अजूनही कायम आहे. अंदाजे दहा असे वादग्रस्त क्षेत्र आधीपासूनच होते आणि गेल्या वर्षी चीनच्या लष्कराने लडाख आघाडीवर अनेक किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी करून असे आणखी अर्धा डझनच्या जवळपास भाग वादग्रस्त जाहीर केले.