कराची : कराची या पाकिस्तानच्या आर्थिक राजधानीच्या मध्य वस्तीत असलेल्या ‘पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज’ या देशाातील सर्वात जुन्या शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न त्या इमारतीचे सुरक्षारक्षक व पोलिसांनी सोमवारी उधळून लावला. इमारतीत घुसू पाहणाऱ्या चारही सशस्त्र हल्लेखोरांना अवघ्या आठ मिनिटांत गारद केले गेले. या कारवाईत त्या इमारतीचे चार सुरक्षारक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन नागरिकांनाही प्राण गमवावे लागले. तीन पोलिसांसह इतर सातजण जखमी झाले.
सकाळी १० च्या सुमारास चार सशस्त्र दहशतवादी पांढºया कॉरेला मोटारीतून इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी दाखल झाले. या रायफलधारी हल्लेखोरांनी हातबॉम्ब फेकून आत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. तेथेच दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु झाला. काही मिनिटांतच सिंध रेंजर्स या सशस्त्र पोलीस दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी चारही हल्लेखोरांना काही मिनिटांतच ठार केले. तीन हल्लेखोर प्रवेशद्वारावर व एक जण काही पावले आत पार्किंग लॉटमध्ये मारला गेला.
कोणत्याही दहशतवादी संघटनेने संध्याकाळपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. पोलिसांनीही संशयित म्हणून कोणत्याही संघटनेचे नाव घेतले नाही. मात्र सिंध रेजर्सचे महासंचालक उमर अहमद बुखारी व पाकिस्तानचे एक कंद्रीय मंत्री फौवाद चौधरी यांनी या हल्ल्यामागे भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेचा हात असल्याचा आरोप केला. चारही हल्लेखोरांकडे एके-४७ रायफली, कित्येक डझन हातबॉम्ब व अनेक दिवस पुरतील एवढी अन्नपाकिटे होती. यावरून शेअर बाजाराच्या मुख्य ट्रेडिंग फ्लोरमध्ये शिरून मोठा रक्तपात करण्याचा त्यांचा इरादा होता, असे बुखारी म्हणाले. कामात व्यत्यय नाहीस्टॉक एक्स्चेंज इमारतीच्याच आवारात पाकिस्तानची सेंट्रल बँक, अन्य काही खासगी बँका व अनेक प्रमुख वित्तीय कंपन्यांची मुख्यालये असल्याने हा परिसर पाकिस्तानचे ‘वॉलस्ट्रीट’ म्हणून ओखळला जातो. कोरोनामुळे निर्बंध लागू असल्याने व दिवसाच्या कामाची सुरुवात असल्याने इमारतीत व आवारातही सुदैवाने फारशी गर्दी नव्हती. हल्ला प्रवेशव्दारावरच रोखला गेल्याने शेअर बाजाराच्या कामकाजात त्याने कोणताही व्यत्यय आला नाही. उलट दिवसभराच्या व्यवहारांनंतर बाजाराचा निर्देशांक वधारला.