इस्लामाबाद : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताच्या ग्वादरमधील एका पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन ते चार दहशतवादी हॉटेलमध्ये घुसले असून गोळीबाराचे वृत्त आहे. पोलिसांनी आजुबाजुचा भाग घेरला असून हॉटेलातील परदेशी नागरिकांना बाहेर काढल्याचे सांगितले. तर दहशतवाद्यांना रोखताना सुरक्षा रक्षकाला गोळ्या घातल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
दहशतवादी प्रसिद्ध पर्ल कॉन्टिनेंटल फाइव स्टार हॉटेलमध्ये घुसले आहेत. आतमध्ये जाताच त्यांनी गोळीबार सुरु केला. यामुळे तेथे दहशतीचे वातावरण बनले होते. सायंकाळी 4.50 वाजण्याच्या सुमारात दहशतवादी हॉटेलात घुसले. मात्र, अद्याप जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. ग्वादरच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील जास्तीतजास्त पाहुण्यांना सुरक्षित बाहेर काढल्याचे सांगितले आहे. दहशतवादी एका मजल्यावर थांबले आहेत.
17 एप्रिलला ग्वादरच्या ओरमारा भागात दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी 7 बसमधून इतर प्रवाशांसोबत जात असलेल्या नौदल, हवाईदलाच्या 11 जवानांसह 14 जणांची हत्या केली होती.