थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांचे दुबईला पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 04:35 PM2017-08-26T16:35:10+5:302017-08-26T16:41:29+5:30
न्यायालयाची कारवाई आणि संभाव्य कारावास टाळण्यासाठी थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांनी पलायन केले आहे.
बॅंकॉक, दि. 26- न्यायालयाची कारवाई आणि संभाव्य कारावास टाळण्यासाठी थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांनी पलायन केले आहे. कालपासून त्या देशाबाहेर गेल्याची चर्चा होत होती. आता त्या सिंगापूरमार्गे दुबईला पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईमध्ये त्यांचे बंधू आणि थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांनीही आश्रय घेतला आहे. आता यिंगलुक इंग्लंडकडे आश्रय देण्याची विनंती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यिंगलुक अशाप्रकारे पळून गेल्यामुळे थायलंडची जनता आश्चर्य व्यक्त करत आहे.
"आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यिंगलुक आधी कंबोडियाला गेल्या, त्यानंतर सिंगापूरमार्गे त्या दुबईला गेल्या." अशी माहिती प्युआ थाई पक्षाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तर थायलंडचे पोलीस उपप्रमुख श्रीवरा रंगसिब्रह्मनकुल यांनी यिंगलुक यांच्या पलायनाबाबत पोलिसांकडे कोणतेही रेकॉर्ड नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिनावात्रा यांचं कुटुंब वर्ष 2001 पासून थायलंडच्या राजकीय वर्तुळात वरचढ झालं. थाकसिन यांचं सरकार 2006 साली झालेल्या बंडामुळे पाडण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाची कारवाई टाळण्यासाठी थाकसिन 2008 साली दुबईला पळून गेले. यिंगलुक शिनावात्रा यांचं सरकार 2014 साली झालेल्या उठावामुळे पडलं. त्यानंतर यिंगलुक यांच्यावरही विविध आरोपांतर्गत खटला सुरु करण्यात आला.
यिंगलुक यांना 10 वर्षे कारावास होण्याची शक्यता बोलून दाखवली जात होती. त्यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या वाणिज्यमंत्र्यांना शुक्रवारी 42 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला. गेली 16 वर्षे शिनावात्रा कुटुंब थायलंडच्या सत्तेशी संबंधित होतं. यिंगलुक यांना देशातील गरीब जनतेमधून मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यांच्यासाठीच यिंगलुक यांनी तांदुळ पुरवठ्याची योजना अंमलात आणली होती. या योजनेमुळे देशाचे 8 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे तेथिल सध्याच्या लष्करी सरकारने म्हटले आहे.
चीनला चक्रीवादळाचा तडाखा, मकाऊ आणि हाँगकाँगमधील जनजीवन विस्कळीत ; 12 जणांचा मृत्यू
दाऊद इब्राहिम तीन पत्ते आणि 21 नावांनिशी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास
यिंगलुक शिनावात्रा या सध्या 50 वर्षांच्या आहेत. 2011 साली त्या देशाच्या 28 व्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या होत्या. थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि गेल्या साठ वर्षातील थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचे वडिल लोएट शिनावात्राही थायलंड संसदेचे सदस्य होते. त्या चिआंग माय राजघराण्याशीही संबंधीत आहेत.