...तर दोन दिवसांत उद्ध्वस्त होणार अर्थव्यवस्था, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेने दिला अखेरचा निर्वाणीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:02 PM2022-05-11T20:02:41+5:302022-05-11T20:03:11+5:30
Sri Lanka Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून अखेरचा धोक्याचा इशारा दिला आहे.
कोलंबो - आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून अखेरचा धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, जर दोन दिवसांच्या आत नव्या सरकारची नियुक्ती झाली नाही तर अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.
वीरसिंधे यांनी सांगितले की, कुणीही अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी सक्षम नसेल. राजकीय स्थैर्य निर्माण झाले पाहिजे. त्यांनी सांगितले की, देशामध्ये सर्वप्रथम गरज ही नव्या सरकारची आहे. दरम्यान, श्रीलंकेतील वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीदरम्यान, श्रीलंकेमध्ये विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा हे नवे पंतप्रधान बनतील, अशी चर्चा आहे. मात्र याला दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, जेव्हा राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा देतील तेव्हाच साजिथ प्रेमदासा हे आपल्या हातात देशाची सत्ता घेतील असे सांगण्यात येत आहे. गोटबाया हे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. महिंदा राजपक्षे यांनी समर्थकांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर राजीनामा दिला होता.
श्रीलंकेमध्ये उसळलेल्या दंगतील आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. देशात आणीबाणी लागू झाली आहे. महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. स्वातंत्र्य झाल्यापासून श्रीलंकेवर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. श्रीलंकन रुपयाची किंमत सातत्याने कोसळत आहे. मार्चमध्ये एक डॉलरची किंमत २०१ श्रीलंकन रुपये होत होती. ती आता ३६० श्रीलंकन रुपयांपर्यंत वाढली आहे. श्रीलंकेत महागाईचा दर हा १७ टक्क्यांचा आकडा पार करून पुढे पोहोचला आहे. दूध, तांदूळ आणि तेलासारख्या जीवनाश्यक वस्तूंसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे.