ट्रम्पवरील छाप्यामागे न्यूक्लिअर कनेक्शन?; जप्त केलेल्या १२ बॉक्सबाबत गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 06:52 AM2022-08-13T06:52:15+5:302022-08-13T06:52:23+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉम हाऊस तसेच मार-ए-लिगो रिसॉर्टवर एफबीआयने मंगळवारी छापे मारले.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी निवासस्थानी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या तपास यंत्रणेने छापा मारला. तिथे अणुकार्यक्रम, अण्वस्त्रांसंदर्भातील (न्यूक्लिअर) कागदपत्रे व इतर काही गोष्टींचा कसून शोध घेण्यात आला. ट्रम्प यांच्या निवासस्थानातून १२ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या बॉक्समध्ये नेमके कोणती कागदपत्रे आहेत याची माहिती एफबीआयने अद्याप जाहीर केलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉम हाऊस तसेच मार-ए-लिगो रिसॉर्टवर एफबीआयने मंगळवारी छापे मारले. त्यावेळी ट्रम्प तिथे उपस्थित नव्हते. एफबीआयने रेड नोटीस न देताच कारवाई केल्याचा आरोप ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. छापे मारले त्यावेळी ट्रम्प आपल्या निवासस्थानी हजर असते, तर त्यांनी या कारवाईचे राजकीय भांडवल करण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांना रेड नोटीस देण्यात आली नाही असे सूत्रांनी सांगितले. ट्रम्प यांच्या निवासस्थानावरील छाप्यांमागचे कारण सांगण्यास ॲटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी नकार दिला आहे. (वृत्तसंस्था)