बर्लिन : काही लिहायचे असल्यास, आपण सामान्यतः कागद किंवा एखाद्या पृष्ठभागाचा वापर करतो. मात्र आता चक्क पाण्यावरही लिहिण्याचे तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. जर्मनीच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डार्मस्टेड आणि डॉननेस गुटेनबर्ग युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी दीर्घकाळ पाण्यात राहणाऱ्या विविध कणांच्या माध्यमातून लेखनाची नवी पद्धत विकसित केली आहे. याबाबतचे संशोधन नॅनो मायक्रो स्मॉल जर्नलमध्ये प्रकाशित झाले. त्यामुळे लेखनाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
काय आहे संशोधन?
पाण्यावर लिहिण्याची पद्धत ही रासायनिक प्रक्रियेवर अवलंबून आहे. त्यास डिफ्युसियोस्मोसिस म्हटले जाते.
यामध्ये पाण्यातील विविध प्रकारच्या कणांची सातत्याने हालचाल सुरू असते.
कणांच्या हालचालींमुळे लिहिलेले अक्षर पाण्याच्या पृष्ठभागाखाली तरंगत असतात.
पाणी झाले कागद, सिलिका बनली शाई
संशोधकांनी यामध्ये कागदाच्या रूपात पाण्याचा, तर शाईच्या रूपात सिलिका घटकांचा वापर केला. भविष्यात कागद, पेन आणि शाईच्या रूपात अन्य घटकांचा वापर करता येतो का, यावर संशोधकांनी प्रामुख्याने भर दिला आहे.
चुंबकीय आणि विद्युत क्षेत्राचा (मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फिल्ड) वापर लिहिण्यासाठी करण्याचाही संशोधकांचा मानस आहे.
रासायनिक प्रक्रिया कशी आहे?
पाण्यातील भारित कण (चार्ज्ड पार्टिकल) प्रमाण हे तुलनेने कमी असल्याने पाणी हे कागदाप्रमाणे काम करते, शाईच्या रूपात असलेले सिलिकेचे कण पाण्यात फिरत असतात.
पेनच्या रूपात असलेले छोटे आयन्स भारित कणांना छोट्याछोट्या कणांमध्ये बदलतात. लहान स्वरूपातील भारित कणांच्या वेगवान हालचालींमुळे ते एका प्रकारे पेनाने लिहिल्याप्रमाणे दिसतात.