लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अंतराळात आणि समुद्राच्या आत अनेक रहस्ये दडलेली आहेत, असे अनेकदा म्हटले जाते. यांच्याशी संबंधित विविध शोधदेखील समोर येत असतात. पण, यावेळी समुद्राच्या तळाशी चक्क एक रस्ता सापडला आहे, जो पाहून शास्त्रज्ञांसह सगळेच थक्क झाले आहेत.
सागरी शास्त्रज्ञांच्या गटाने पॅसिफिक महासागराच्या तळाशी एक विचित्र पिवळा विटांचा मार्ग शोधला आहे. ‘एक्सप्लोरेशन व्हेसेल नॉटिलस’च्या अभ्यासकांनी हा लपलेला रस्ता शोधला. अमेरिकेतील ‘पापहानोमोकुआके मरिन नॅशनल मोन्युमेंट’मधील (पीएमएनएम) लिलीउओकलानी रिज नावाच्या क्षेत्राचा अभ्यास करताना त्यांनी विचित्र दिसणारी रचना पाहिली. हा रस्ता हवाई बेटांच्या उत्तरेला आढळला आहे. हे जगातील सर्वात मोठ्या सागरी संवर्धन क्षेत्रांपैकी एक आहे.
पीएमएनएमचे क्षेत्र प्रचंड मोठे असून, तिथे खोली ३,००० मीटरच्याही पुढे जाते. आतापर्यंत संपूर्ण क्षेत्रापैकी फक्त ३ टक्के भाग शोधला गेला आहे. सध्या ही कुठल्या जुन्या सभ्यतेची किंवा कुठल्या रस्त्याची चिन्हे नसून, हजारो वर्षांपूर्वीचा तलाव कोरडा पडल्याने तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा पाण्याखालील संरचना ‘सीमाउंट’ म्हणजे एकप्रकारे समुद्रातील पर्वत म्हणून ओळखल्या जातात. सीमाउंट्स हे ज्वालामुखीच्या क्रियाकलापांनी तयार झालेले पर्वत होत. पुढे, संशोधकांनी स्पष्ट केले की, खडकामधील फ्रॅक्चरचा ‘अद्वितीय’ नमुना ज्यामुळे ‘कोबल्ड’ तयार होते, बहुधा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वारंवार गरम होणे आणि वेळोवेळी थंड होण्याचा परिणाम आहे. यापूर्वी या क्षेत्राचे सर्वेक्षण केले नाही, परंतु आता याचा सखोल अभ्यास करणार आहे, असेही संशोधकांनी नमूद केले आहे.
मोहिमेचे उद्दिष्ट नॉटिलस एप्रिलपासून या भागाचा आणि आसपासच्या परिसरात शोधमोहिम राबवीत आहे. या मोहिमांचा सर्वात चांगला भाग म्हणजे केवळ संशोधकच नाही तर इंटरनेट असलेली कोणीही व्यक्ती युट्यूबवरही पाहू शकतात. आतापर्यंत मनुष्य पोहोचू न शकलेल्या खोलीपर्यंत पोहोचणे आणि पृथ्वीच्या लपलेल्या भूविज्ञानाबद्दल अधिक जाणून घेणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.