मालदीवमध्ये रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत चीन समर्थक मानले जाणारे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. मुइज्जू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) पक्षाची दोन तृतियांशी बहुमताच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार ९३ सदस्यीय सभागृहातील आतापर्यंत ८६ जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये मुइज्जू यांच्या पक्षाला तब्बल ६६ जागा मिळाल्या आहेत. तर ६ जागांवर अपक्ष उमेवार निवडून आले आहेत. उर्वरित ७ जागांवरील निकाल जाहीर व्हायचे बाकी आहेत. मात्र आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये मुइज्जू यांच्या पक्षाला मिळालेल्या ६६ जागा ह्या बहुमताचा आकडा असलेल्या ४७ जागांपेक्षा १९ ने अधिक आहेत.
मालदीवच्या संसदेमध्ये आतापर्यंत मुइज्जू यांचा विरोधी पक्ष असलेल्या सोलिह यांच्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीकडे ४४ सदस्यांसह बहुमत होतं. संसदेत बहुमत नसल्याने मुइज्जू यांना नवे कायदे बनवण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता निवडणुकीतील मोठ्या विजयासह संसदेत बहुमत मिळाल्याने मुइज्जू यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाला मिळालेला विजय हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच मालदीवमधील जनता ही भारतासह अन्य कुठल्याही देशाशी असलेल्या जवळीकीपेक्षा राष्ट्रपतींच्या चीनसोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांची पाठराखण करत आहे, असा या निकालांचा सर्वसाधारण अर्थ निघत आहे. मोहम्मद मुइज्जू हे गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी होऊन राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले होते. त्यांनी आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान, मालदीवचं इंडिया फर्स्ट धोरण संपुष्टात आणण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी त्या दिशेने पावलंही टाकली होती. आता जनतेनेही या निकालांमधून त्यांच्या धोरणावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसत आहे.