बीजिंग, दि.15- भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘दोन देशांमध्ये सहकार्य असावं, पण गटबाजी असू नये,’ अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या महत्त्वाकांक्षी योजनेला उत्तर म्हणून भारत आणि जपानने फ्रिडम कॉरिडॉरची उभारणी सुरु केल्यानेसुद्धा चीनचा जळफळाट झाला आहे.
भारत आणि जपानमध्ये गुरुवारी १५ सामंजस्य करार झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी हिंदी आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. भारत आणि जपानच्या या वाढत्या मैत्रीमुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. देशांनी कोणत्याही तणावाविना संवाद साधावा, अशी आमची भूमिका आहे. दोन देशांनी गटबाजी नव्हे, तर सहकार्य करावे,’असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हंटलं आहे. भारत आणि जपानच्या जवळिकीबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना हुआ चुनयिंग यांनी हे उत्तर दिलं आहे.
जपानकडून भारताला यूएस-२ ही सागरी भागात टेहळणी करणारी विमाने दिली जाणार आहेत. पण या मुद्यावर भाष्य करणं चीनने टाळलं. या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास चिनी प्रवक्त्यांनी नकार दिला. भारताला टेहळणी विमानं देण्याच्या जपानच्या निर्णयामुळे चीनला धक्का बसला आहे. कारण याआधी जपानने कोणत्याही देशासोबत संरक्षण क्षेत्राशी संबंधित वाहनं किंवा सामग्रीच्या विक्रीसाठी करार केलेला नाही. त्यामुळेच जपानच्या या निर्णयामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जपानच्या सहकार्याने भारतात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन गुरूवारी नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांनी केलं. मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनमुळेही चीनची चिंता वाढली असल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. भारतात हायस्पीड ट्रेन प्रकल्प सुरु करण्यासाठी चीनदेखील उत्सुक आहे. नवी दिल्ली आणि चेन्नई दरम्यान हायस्पीड ट्रेन प्रकल्पासाठी करार करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरु आहेत. चीन आणि जपानमध्ये पूर्व चिनी सुमद्रातील बेटांवरुन मोठा वाद सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानने भारताशी करार केल्याने आणि दोन देशांमधील संबंध आणखी मजबूत झाल्याने चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे.