नवी दिल्ली - कँडीमध्ये सुरु झालेली धार्मिक दंगल देशामध्ये पसरू नये यासाठी संपूर्ण श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. बौद्ध आणि मुस्लिम या दोन समाजांमधील हा संघर्ष अचानक भडकलेला नाही. मागच्या वर्षभरापासून या दोन समाजांमध्ये असणाऱ्या तणावाने आता हिंसेचे रुप घेतले आहे. श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम समोरासमोर येण्यामागे ही पाच प्रमुख कारणे आहेत.
- धर्मांतर हे या हिंसाचाराचे मुख्य कारण आहे. श्रीलंकेत बौद्धांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याचा आरोप काही प्रखर बौद्ध संघटनांकडून करण्यात येत होता.
- श्रीलंकेत प्राचीन बौद्ध स्थळांची तोडफोड करण्यात आली त्यामागेही मुस्लिम संघटना असल्याचा आरोप करण्यात आला. - म्यानमारमध्ये हिंसाचार सुरु असल्याने रोहिंगे मुस्लिम श्रीलंकेमध्ये आश्रयाला आले. त्यांना देशात थारा देऊ नये यासाठी काही राष्ट्रवादी बौद्ध संघटनांनी जोरदार आंदोलनही केले होते.
- सध्या हिंसाचार फक्त कँडी शहरात झाला आहे. पण देशाच्या अन्य भागातही हा हिंसाचार वेगाने पसरु शकतो असे अलजजीरा वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे.
- श्रीलंकेत यापूर्वीही जातीय हिंसाचारात अनेकांचे प्राण गेले आहेत. श्रीलंकेत एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के मुस्लिम आहेत. 75 टक्के बौद्ध आणि 13 टक्के हिंदू आहेत.
- फेब्रुवारी महिन्यातही बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जण जखमी झाले होते. अनेक दुकाने आणि मशिदींची नासधूस करण्यात आली होती.
- 2015 मध्ये सत्ता मिळवल्यानंतर राष्ट्रपती सिरिसेना यांनी मुस्लिम विरोधी हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण त्यात पुढे फारशी प्रगती झाली नाही.