खेरसन : रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या खेरसन भागात झालेल्या हल्ल्याने तेथील नोव्हा काखोवका धरण उद्ध्वस्त होऊन त्यातील पाणी प्रचंड वेगाने आजूबाजूच्या गावांमध्ये शिरले. त्यामुळे आलेल्या पुरामुळे काही हजार घरे वेढली गेली आहेत. तसेच या गावांतून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
नोव्हा काखोवका धरणावर हल्ला केल्याचा आरोप रशिया व युक्रेनने परस्परांवर केला आहे. मात्र, दोन्ही देशांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे या हल्ल्यामागील सूत्रधार कोण, याचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. गेल्या १६ महिन्यांपासून युक्रेन युद्ध सुरू असल्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीची कामे होऊ न शकल्याने त्याची भिंत कोसळली असावी, अशीही चर्चा आहे. पण, त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. रणनीतीचा भाग म्हणून रशियानेच हल्ल्याद्वारे धरण उद्ध्वस्त केले असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
धरणातील पाणी परिसरातील गावांमध्ये शिरून तिथे जागोजागी ३ फूट पाणी साचले आहे. जगातील मोठ्या धरणांपैकी एक असलेले नोव्हा काखोवका धरण व तेथील जलविद्युतनिर्मिती केंद्र नष्ट झाल्यामुळे खेरसन भागात पिण्याचे पाणी व वीज यांची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.
सात जण बेपत्ता
रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनमधील नोवा काखोवका या शहरात पुरामुळे सात जण बेपत्ता आहेत, तर ९०० जणांची पाण्यातून सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.