मास्क घातलेल्या तीन पाकिस्तानी चोरांचा भारतीयावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 01:32 AM2020-11-24T01:32:06+5:302020-11-24T01:32:17+5:30
न्यायालयात खटला सुरू : घरातून रोख रकमेसह इतर साहित्य घेऊन केले पलायन
दुबई : संयुक्त अरब अमिरातमध्ये मास्क घातलेल्या तीन पाकिस्तानी चोरांनी ३३ वर्षीय भारतीयावर हल्ला करून त्याच्या घरातून लॅपटॉप, मोबाइल फोन व इतर रोख रक्कम चोरून नेली. येथील माध्यमांत याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
दुबईच्या फर्स्ट इन्स्टान्स न्यायालयात रविवारी सुनावणीदरम्यान पीडित भारतीयाने आरोप केला की, हे चोर ऑगस्टमध्ये माझ्या घरात घुसले व त्यांनी तेथून अनेक साहित्याची चोरी केली. या चोरांनी माझा चेहरा प्लास्टिक पिशवीने झाकला होता व तोंडावर टेप चिटकवलेला होता. पीडित व्यक्तीने म्हटले आहे की, चोरांपैकी एकाने माझे तोंड दाबले व दुसऱ्याने धातूच्या काठीने हल्ला केला. मी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांनी मला जखडून ठेवले. मी एका चोराचा मास्क ओढला व त्याचा चेहरा पाहिला. मी कसेतरी चेहऱ्यावरील प्लास्टिक पिशवी काढली व तोंडावरील टेपही काढला. माझ्याजवळच राहणाऱ्या मित्राकडे गेलो. त्यानंतर आम्ही हल्लेखोरांना पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या गस्ती पथकाने एका चोराला अटक केली असून, त्याचे दोन साथीदर फरार आहेत. दुबई पोलिसांनी पाकिस्तानी चोराच्या विरोधात दरोडेखोरी, हल्ला करण्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.