Video : टेक ऑफच्या वेळी ‘रन वे’वर झाला मोठा अपघात, क्षणार्धातच विमानानं घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:09 AM2022-05-12T09:09:21+5:302022-05-12T09:30:54+5:30
चीनच्या चोंगकिंग येथे गुरूवारी विमानाचा मोठा अपघात झाला. तिबेट एअरलाईन्सचं विमान टेक ऑफच्या दरम्यान रनवे वरुन घसरलं.
चीनच्या चोंगकिंग (Chongqing) मध्ये गुरूवारी मोठा अपघात झाला. विमानतळावर तिबेट एअरलाईन्सचं विमान टेक ऑफ दरम्यान रन वे वरून घसरलं. यानंतर क्षणार्धातच या विमानाला आग लागली. या विमानात ११३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर प्रवास करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असल्याची माहिती सरकारी माध्यमाकडून देण्यात आली. सीसीटीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार चोंगकिंगहून न्यांगची येथे जाणाऱ्या विमानात चोंगकिंग जियांगबेई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आग लागली.
या विमानातील सर्व ११३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती पीपल्स डेलीनं विमान कंपनीच्या हवाल्यानं दिली आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना त्वारित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला असून विमानाला आग लागल्याचं यात स्पष्टपणे दिसत आहे. तसंच ही आग विझवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचं यात दिसून येत आहे.
According to reports, at about 8:00 on May 12, a Tibet Airlines flight deviates from the runway and caught fire when it took off at Chongqing Jiangbei International Airport.#chongqing#airplane crash #firepic.twitter.com/re3OeavOTA
— BST2022 (@baoshitie1) May 12, 2022
ज्यावेळी विमान चोंगकिंग येथून न्यांगची येथे जात होते तेव्हा क्रूला संशय आणि त्यांनी विमान पुन्हा खाली उतरलवलं. यानंतर विमानाला आग लागल्याचं दिसल्याचं विमान कंपनीनं सांगितलं. सर्व प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. जे प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही तिबेट एअरलाईन्सनं दिली.
दोन महिन्यांपूर्वी मोठा अपघात
दोन महिन्यांपूर्वीही चीनमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला होता. चीनच्या ईस्टर्न एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात धाला होता. यामध्ये १३२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या विमानात एकूण १२३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर्स होते.