टेस्लाच्या १० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; इलॉन मस्क लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:07 AM2022-06-04T07:07:49+5:302022-06-04T07:07:59+5:30
सध्या अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय वाईट भावना
न्यूयॉर्क : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहेत. सध्या अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय वाईट भावना असून, किमान १० टक्के कर्मचारी कमी करावे लागतील, असे मस्क यांनी म्हटले आहे.
यासंबंधित ई-मेल टेस्लाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी पाठवण्यात आला असून, जगभरातील नवीन लोकांना नोकरीवर घेण्याची प्रक्रिया थांबवा. अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय वाईट मत तयार झाले आहे, असे त्यात म्हटले आहे. मंगळवारी मस्क यांनी कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता की, जे कामावर येणार नाहीत त्यांनी टेस्लाचे काम करणे सोडावे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आठवड्यात किमान ४० तास काम करणे आवश्यक आहे.
ॲास्ट्रेलियाच्या उद्योगपतीची कर्मचाऱ्यांना ॲाफर
टेस्लाचे सीईओ मस्क आणि ऑस्ट्रेलियाचे अब्जाधीश ट्टिटरवर भिडले आहेत. प्रत्येकाला ४० तास काम करावे लागेल, असे मस्क यांनी आदेशात म्हटले होते. यावर १९५० च्या दशकाप्रमाणे आदेश असे म्हणत उद्योगपती स्कॉट फरक्कार यांनी मस्क यांनी टोमणा मारला. तसेच त्यांनी यावेळी टेस्लाच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या कंपनीमध्ये नोकरी करावी, अशी ॲाफरही दिली.
स्वयंचलित गाड्यांना अचानक लागतोय ब्रेक
टेस्लाच्या स्वयंचलित ड्रायव्हिंग सिस्टमवर चालणाऱ्या कार कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय रस्त्यांवर अचानक थांबण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबतच्या ७५० पेक्षा अधिक तक्रारी सुरक्षा नियामकांकडे केल्या आहेत.