लंडन : मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास दंड भरावा लागतो किंवा विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यास दंड आकारला जातो. पण हळू गाडी चालवत असताना पोलिसांनी दंड आकारला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. लंडनच्या एका शहरात असाच प्रकार घडला आहे. एक महिला ठराविक मर्यादेपेक्षा कमी स्पीडने गाडी चालवत होती, म्हणून तिच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. हा प्रकार जेव्हा ट्विटवर शेअर झाला तेव्हा तरुण नेटिझन्सनेही या प्रकाराची खिल्ली उडवली. आपल्या आईवडिलांना टॅग करून आता तरी स्लो गाडी चालवण्यास सांगू नये असं नेटिझन्सने म्हटलं आहे.
दि स्टार या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार लंडनच्या ४०१ मॅलारिटोन या रस्त्यावर एक ४० वर्षीय महिला फास्ट लेनवरून हळू गाडी चालवत होती. त्यामुळे इतर गाडी चालकांना त्रास होत होता. म्हणून एका चालकाने तिच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी लागलीच तिच्या गाडीचा पाठलाग करत तिला अडवलं आणि ताब्यात घेतलं. यावेळी त्या महिलेचं लायन्सस आणि इन्शुरन्स आदी कागदपत्रेही तपासण्यात आली. ती गाडी नक्की तिचीच आहे ना? तिच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे का? या गोष्टींची तपासणी करून झाल्यावर पोलिसांनी तिच्यावर दंडात्मक कारवाई केली. गाडी हळू चालवण्यामागचं कारण विचारलं असता तिनं सांगितलं की, या रस्त्यावर कमी स्पीडने गाडी चालवण्याचा नियम असल्याचा तिचा समज झाला होता. त्यामुळे या महिलेने ४० किमी वेगाने गाडी चालवली होती. पण तिच्या या वेगामुळे साहजिकच ट्रॅफिक झालं. या ट्रॅफिकला वैतागलेल्या एका इसमाने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि तिच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गाडी चालवताना प्रत्येक चालकाने वाहतुकीचे नियम पाळायलाच हवेत. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणं जसं गुन्हा आहे तसाच मर्यादेपेक्षा हळू गाडी चालवणंही गुन्हा आहे. कारण प्रत्येक रस्त्यावर किती किमी वेगाने गाडी चालवायला हवी याविषयी नियम आखलेले असतात. हे नियम अपघात होऊ नयेत याकरताच असतात. म्हणूनच वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं असतं.
आपल्याकडे अद्यापही गाडी हळू चालवण्यामुळे कोणावर कारवाई झालेली ऐकिवात नाही. पण असं आपल्याबाबतीतही घडू शकतं. हा सगळा प्रकार जेव्हा सोशल मीडियावर शेअर झाला तेव्हा नेटिझन्सनी या प्रकाराची चांगलीच खिल्ली उडवली.
काही जणांनी म्हटलं की, ‘हा प्रकार मला समजला तेव्हा मी लगेच माझ्या आईला फोन केला, मला वाटलं तीच असेल.’ तर काही जणांनी आपल्या आई-वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली, जेणेकरून गाडी हळू चालव असा त्यांच्या मागचा ससेमिरा कमी होईल.