अणुबॉम्ब चाचणीची शिक्षा, उत्तर कोरियावर युनोने लादले कठोर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 09:39 PM2017-09-12T21:39:17+5:302017-09-12T21:39:17+5:30
तीन सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने सहावी आणि सगळ्यात मोठी अणू चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत.
संयुक्त राष्ट्रे, दि. 12 : तीन सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने सहावी आणि सगळ्यात मोठी अणू चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत. आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने एकमताने कठोर निर्बंध लादणारा ठराव संमत केला. या निर्बंधांचा मसुदा अमेरिकेने केला होता. उत्तर कोरियाला त्याच्या अणु कार्यक्रमापासून रोखण्यासाठी त्याच्या तेलाच्या आयातीला आणि कापडाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्बंधांचा समावेश आहे.
अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाला जग कधीही स्वीकारणार नाही, असे आज आम्ही म्हणत आहोत. आणि आज सुरक्षा परिषद म्हणत आहे की जर उत्तर कोरियाने आपला अणू कार्यक्रम थांबवला नाही तर तो थांबवण्याचे काम आम्ही स्वत: करू, असे संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यावेळी म्हणाल्या.
उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांच्या 15 सदस्यांच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी निर्बंध लादणारा ठराव एकमताने संमत केला होता. उत्तर कोरियाने योग्य त्या गोष्टी कराव्यात यासाठी आम्ही प्रयत्न केले. चुकीच्या गोष्टी पुढेही सुरू ठेवण्याची त्याची क्षमता रोखण्यासाठी आम्ही आता कृती करीत आहोत, असे हॅले म्हणाल्या. उत्तर कोरियाला त्याच्या अणु कार्यक्रमासाठी मिळणा-या पैशांच्या क्षमतेवर घाव घालण्याचे काम संयुक्त राष्ट्रे करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
उत्तर कोरियाकडून होत असलेल्या संपूर्ण तेल आयातीवर बंदीसह अमेरिकेने मूळात कठोर निर्बंधांचा प्रस्ताव मांडला होता. परंतु निर्बंधांत कपात केल्यानंतरच उत्तर कोरियाचे मित्र देश रशिया आणि चीनच्या संमतीनंतर ठराव संमत झाला. हॅले म्हणाल्या की, उत्तर कोरियाचे अण्वस्त्रांच्या उभारणीचे प्रयत्न आणि त्याच्या चाचण्यांचा मुख्य आधार हा तेल आहे. वायू, डिझेल आणि जड इंधन तेलामध्ये 55 टक्के कपात केल्यामुळे उत्तर कोरियाला मिळणा-या तेलात ठरावाने 30 टक्के कपात केली आहे. या निर्बंधांमुळे उत्तर कोरियाच्या वार्षिक महसूलात 500 दशलक्ष किंवा त्यापेक्षाही जास्त अमेरिकन डॉलरची कपात होणार आहे.
आम्ही कुठेही आणि कधीही न्यूक्लियर टेस्ट करू- उत्तर कोरिया
आम्ही कुठेही आणि कधीची न्यूक्लियर टेस्ट करू शकतो, अशी धमकीच उत्तर कोरियानं अमेरिकेला दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं स्वतःची यूएसएस कार्ल विल्सन ही युद्धनौका कोरियन द्विपकल्पात तैनात केली आहे. त्यामुळे कोरियन द्विपकल्पात तणाव वाढला आहे. तसेच कोणत्याही दबावाला न घाबरता उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनीही अमेरिकेला युद्धासाठी तयार असल्याची धमकी दिली आहे. आम्ही कोणत्याही हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णतः तयार आहोत. आम्ही कधीही आणि कुठेही अण्वस्त्र चाचणी करण्यासाठी सक्षम आहोत. मात्र याचा निर्णय देशाच्या सर्वोच्च नेत्याला घ्यावा लागणार आहे, असं वक्तव्य उत्तर कोरियाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी केलं आहे.
आमच्या तीन बॉम्बनी जगाचा होईल विनाश- उत्तर कोरिया
आमच्याकडे असंख्य अणुबॉम्ब असून, त्यातल्या केवळ तीन अणुबॉम्बनी संपूर्ण जगाचा नायनाट होऊ शकतो," अशी धमकी उत्तर कोरियाच्या पश्चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी दिली आहे. ते म्हणाले, उत्तर कोरियाला कोणीही हात लावू शकत नाही. जर असं झाले तर लोक बंदुका आणि मिसाइलनं देशाची सुरक्षा करतील. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब आहेत. त्यातील तीन अणुबॉम्ब हे पूर्ण जगाला नेस्तनाबूत करण्यासाठी पुरेसे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील इसिसच्या तळांवर अमेरिकेनं "मदर ऑफ ऑल बॉम्ब" टाकला होता. इसिसला दिलेल्या दणक्यानंतर अनेक देशांकडून उत्तर कोरियाला धमक्या येत आहेत. एका स्पॅनिश न्यूज साइटशी बोलताना बेनोस यांनी उत्तर कोरियाच्या युद्धविषयक अभ्यासाचीही माहिती दिली आहे.