ट्रम्प-किम यांच्या बैठकीचे हॉटेल ठरले, सेंटोसा बेटावर होणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 12:50 PM2018-06-06T12:50:50+5:302018-06-06T12:50:50+5:30
किम आणि ट्रम्प हे 12 जून रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता या हॉटेलमध्ये भेटतील.
सिंगापूर- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांच्या 12 जूनरोजी होणाऱ्या भेटीचे ठिकाण व्हाईट हाऊसने आज जाहीर केले. सिंगापूरजवळील सेंटोसा बेटावर कॅपेला हॉटेलमध्ये हे दोन नेते भेटणार आहेत.
व्हाईट हाऊसच्या माध्यमसचिव सारा हकाबी सँडर्स यांनी ट्वीटरवरून ही माहिती जाहीर केली.
''अपडेट- डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची सेंटोसा बेटावरील कॅपेला हॉटेलमध्ये भेट होणार आहे. सिंगापूरने या भेटीसाठी यजमानपद स्वीकारून केलेल्या आदरातिथ्याबद्दल आम्ही आभारी आहोत'' असे ट्वीट सारा यांनी केले आहे.
किम आणि ट्रम्प हे 12 जून रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता या हॉटेलमध्ये भेटतील. ही बैठक केवळ एकच दिवस चालणार आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए- इन यांनी ट्रम्प यांना या बैठकीनंतर आपण तीन देशांनी मिळून एक चर्चापरिषद घेऊ अशी विनंती केली आहे. मात्र व्हाईट हाऊसने याबाबत अजून कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. बैठकीसाठी या हॉटेलची निवड होईल अशी चर्चा एक आठवडाभर सुरुत होती. ट्रम्प आणि किम यांच्या भेटीमध्ये अनेक अडथळे येत होते. मात्र आता सारा यांनी केलेल्या या घोषणेमुळे त्यांची चर्चा नक्की होईल हे तरी निश्चित झाले आहे.
गुरख्यांकडे सुरक्षाव्यवस्था
या दोन्ही नेत्यांच्या भेटीसाठी सुरक्षा व्यवस्थाही तितकीच कडक असणार आहे. या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नेपाळच्या गुरख्यांकडे देण्यात आलेली आहे.हे दोन्ही नेते त्यांचे संरक्षण करणारे स्वतःचे समूह घेऊनच सिंगापूरमध्ये येणार आहेत. तसेच सिंगापूर पोलीस, गुरखा सुरक्षारक्षकांचे दल शिखर परिषदेच्या जागेचे रक्षण करेल.
रस्ते, हॉटेल्स आणि मुत्सद्दी, राजनयीक अधिकारी या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारीही गुरख्यांकडे आहे. सिंगापूरमध्ये गुरख्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे संरक्षण सचिव जीम मॅटिस यांनी सिंगापूरला भेट दिली तेव्हाही सुरक्षेची जबाबदारी गुरख्यांकडे देण्यात आली होती. नेपाळच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या या गुरख्यांना सिंगापूर पोलिसांनी भरती करुन घेतले आहे. सुरक्षा जॅकेट्स, बेल्जीयन बनावटीचे स्कार कॉम्बॅट अझॉल्ट रायफल, पिस्तुले असे ते सुसज्ज असतील. सिंगापूर पोलिसांमध्ये 1800 गुरखा असतील असावेत असा अंदाज आहे. नेपाळमधील गुरख्यांची एक लढवय्या जमात म्हणून ओळख आहे. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना सैन्यदलांमध्ये भरती करुन घेतले होते. त्यामुळे भारत, नेपाळ, सिंगापूर, इंग्लंड, ब्रुनेई या देशांच्या लष्करामध्ये सेवा बजावत आहेत. त्यांनी दोन्ही महायुद्धांमध्ये तसेच फॉकलंड बेटांसाठीच्या लढाईत व नुकत्याच अफगाणिस्तान कारवाईतही सहभाग घेतला होता.