नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून चीनविरोधात अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुरू असलेल्या व्यापारयुद्धाची झळ भारतापर्यंत येऊन पोहोचली आहे. भारताने जर अमेरिकी उत्पादनांवर सीमा शुल्क न हटविल्यास भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांची धमकी अशा वेळी आली आहे की, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प हे जपानमधील जी-20 देशांच्या शिखर परिषदेमध्ये भेटणार आहेत.
रशियाकडून भारत खरेदी करत असलेल्या एस-400 या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीला अमेरिकेचा विरोध आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी नुकतीच मोदी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोदींनी यास ठाम नकार देत देशाच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणारच असे ठामपणे कऴविले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी व्यापारयुद्धाची कुरापत काढली आहे. इराणकडून तेल घेण्यास ट्रम्प यांनीच विरोध करत गंभीर परिणाम होण्याच इशारा दिला होता.
ट्रम्प यांनी व्यापारयुद्धाचे ट्वीट केले आहे. यावरून स्पष्ट झाले आहे की, उद्या होणारी जपानच्या ओसाका येथील बैठक चांगल्या वातावरणात होण्याची शक्यता कमी आहे. या बैठकीमध्ये व्यापाराशी संबंधीत मुद्दे चर्चेत असणार आहेत. हे मुद्दे भारत आणि अमेरिकेदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अडचणी निर्माण करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या मुद्द्यावर भारत झुकत नसल्याने ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, चीन नंतर भारतासोबतही व्यापार युद्ध करण्यास मागे हटणार नाही. यामागे कारणही तसेच आहे. अमेरिकी कार, बाईकवर भारताकडून 120 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावले जाते. तर भारताच्या उत्पादनांना अमेरिकेमध्ये शुल्कमाफी आहे. यामुळे ट्रम्प यांनी बऱ्याचदा यावर निपसंती दर्शविली आहे.