नववर्षाच्या सुरूवातीलाच ट्रम्प यांचा झटका; वर्क व्हिसाबाबत घेतला मोठा निर्णय
By जयदीप दाभोळकर | Published: January 1, 2021 10:29 AM2021-01-01T10:29:09+5:302021-01-01T10:31:06+5:30
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि अमेरिकेत रोजगाराची संधी शोधणाऱ्या भारतीयांवरही मोठा परिणाम होणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षाच्या सुरूवातीलाच एक मोठा झटका दिला आहे. अमेरिकेत कामासाठी जाणाऱ्या व्यक्तींना मिळणाऱ्या व्हिसाबाबत ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतलाय. स्थलांतरीतांना मिळणाऱ्या व्हिसावर दिलासा देण्यास ट्रम्प प्रशासनानं नकार दिला. गुरुवारी रात्री यासंदर्भात एक एक्सिक्युटिव्ह ऑर्डर जारी करण्यात आली. यामध्ये इमिग्रेसन आणि वर्क व्हिसावरील बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याचं म्हटलं आहे.
ट्रम्प प्रसासनानं पहिल्यांदा या व्हिसावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी तात्पुरते निर्बंध घातले होते. त्यानंतर हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला होता. परंतु आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतल अमेरिकी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
का घेतला निर्णय?
अमेरिकेतील नागरिकांना अधिक नोकऱ्या आणि संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेतल्याचं सीएनएननं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं. ट्रम्प यांच्या मोठ्या निर्णयामुळे आता ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यांना आता मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसंच रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांनाही आता मार्च महिन्यापर्यंत थांबावं लागणार आहे. कोरोना महासाथीमुळे अमेरिकन लोकांचे रोजगार जात आहेत. त्यामुळे आम्ही अमेरिकन लोकांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ असं ट्रम्प यांनी जून महिन्यात म्हटलं होतं.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी यापूर्वीच आपल्या कॅम्पेनदरम्यान या निर्बंधांचा विरोध केला होता. परंतु आता राष्ट्राध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ते हा निर्णय मागे घेतील का? हे आता पाहालं लागणार आहे.