मुंबई, दि. 22 - सोमवारी 21 ऑगस्ट रोजी अमेरिकेत 99 वर्षांनंतर पहिल्यांदाच खग्रास सूर्यग्रहाण दिसलं. यापूर्वी 1918 मध्ये खग्रास सूर्यग्रहण दिसलं होतं. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो त्यावेळी ग्रहण लागतं. या दरम्यान काहीवेळासाठी काळोख पसरतो. यंदा सूर्यग्रहणाचा काळोख थोड्यावेळासाठी सोशल मीडियावरही पसरला होता. ज्यावेळी चंद्राने ट्विटरवर देखील सूर्याचा रस्ता अडवला होता तेव्हा हा काळोख पसरला होता.
अमेरिकेची अवकाश संस्था नासाचे ट्विटरवर 'नासा मून' आणि 'नासा सन' असे ट्विटर हॅंडल आहेत. ग्रहण लागल्यानंतर 'नासा मून' या हॅंडलवरून सूर्याला ब्लॉक केल्याचा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला. यासोबत 'हा हा हा...मी सूर्याचा मार्ग अडवला आहे...चंद्रासाठी मार्ग मोकळा करा...' असं ट्विट करण्यात आलं होतं.या ट्विटवर 'ओह, एक्सक्यूज मी?! असं ट्विट 'नासा सन'ने केलं आणि सोशल मीडियावर हशा पिकला. 'नासा मून' आणि 'नासा सन' यांचं हे संभाषण ट्विटराइट्सच्या चांगल्याच पसंतीस उतरलं आहे. नासा मूनच्या या ट्विटला आतापर्यंत 1 लाख 58 हजार जणांनी रिट्विट केलं तर 3 लाखांहून अधिक जणांनी हे ट्विट लाईक केलं आहे.
सोमवारी (२१ ऑगस्ट) श्रावण अमावास्येच्या दिवशी अमेरिकेतील चौदा राज्यातून सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसली. त्यासाठी अमेरिकेच्या इतर भागातून आणि जगातून अनेक खगोलप्रेमी अमेरिकेतील या चौदा राज्यांत सूर्यग्रहणातील छायाप्रकाश लहरी, डायमंड रिंग, प्रभाकिरिट ( करोना ) , भर दिवसा होणा-या अंधारात घडणारे ग्रह- तारकांचे दर्शन इत्यादी सुंदर अविष्कार पाहण्यासाठी एकत्र आले होते.
या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकेच्या ओरेगॉन ,इडाहो,व्योमिंग, मोंटाना,इओवा, कॅनसन्स, नेब्रास्का,मिसौरी, इलिनोइस, केनटकी,टेनेसा,जार्जिया, उत्तर करोलिना आणि दक्षिण करोलिना या चौदा राज्यातून दिसली. ब-याच कालावधीनंतर अमेरिकेच्या मोठ्या भागातून हे खग्रास सूर्यग्रहण दिसल्याने खगोलप्रेमीनी त्या भागांत गर्दी केली होती. विमान कंपन्यांनी प्रचंड भाडेवाढ केली होती, खग्रास पट्ट्यातील हॉटेल्सनीही भाडे दुप्पट केले होते. ग्रहण पाहण्याचे चष्मे सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी 21 ऑगस्ट रोजी अमेरिकेत मोठा ' सूर्यग्रहणोत्सव ' साजरा झाला. यासाठीची पूर्वतयारी खूप अगोदरपासून करण्यात आली होती.
भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी २६ डिसेंबर २०१९ रोजी मिळणार आहे. तसेच खग्रास सूर्यग्रहण भारतातून २० मार्च २०३४ रोजी काश्मीरमधून दिसणार आहे.