काबूल: अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या दोन स्फोटांमध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय. तर या स्फोटात 45 जण जखमी झालेत. सकाळच्या सुमारास काबूलमध्ये एकापाठोपाठ एक असे दोन स्फोट झाले. मृतांमध्ये एएफपी वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार शाह मराई यांच्यासह पाच पत्रकारांचा समावेश आहे. याशिवाय या स्फोटात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. दोन्ही स्फोट आत्मघाती हल्लेखोरांनी केल्याची माहिती काबूल पोलिसांच्या प्रमुखांचे प्रवक्ते हशमत स्टानेकझई यांनी दिली. यातील पहिला आत्मघाती हल्लेखोर दुचाकीवरुन आला होता. या हल्ल्यानंतर काही पत्रकार वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी दुसरा हल्लोखोर पत्रकारांजवळ उभा होता. त्यानं हा स्फोट घडवून आणला. याबद्दल अद्याप परराष्ट्र मंत्रालयानं कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.