बेरूत - लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी दोन भयंकर स्फोट झाले. या स्फोटांचे धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्फोट झाल्यानंतर संपूर्ण आकाशात केवळ धुरच दिसत होता. हे स्फोट नेमके कसे आणि कशामुळे झाले? हे अद्याप कळू शकलेले नाही. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार या स्फोटांमुळे शहरातील अनेक इमारंतींचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आरटी न्यूजनुसार, येथे एकूण दोन स्फोट झाले. यातील एक स्फोट पोर्ट भागात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला. तर दुसरा स्फोट शहरात झाला आहे. हे स्फोट एवढे भयानक होते, की यामुळे दूर-दूरच्या इमारंतींचेही नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे इमारतींना बसलेले हादरे आणि आकाशात उठलेले धुराचे लोट सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसत आहेत.
या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, लेबनानच्या आरोग्य विभागाने सर्व उपलब्ध रुग्णालयांना जखमींना दाखल करून घेण्यासाठी तयार रहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी टीव्हीवर बोलताना, मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. वृत्तात फटाक्यांमुळे हा स्फोट झाल्याचे म्हणण्यात आले आहे.