लंडन:
जर तुमच्या घरातील वस्तूंवर आता 'मेड इन स्पेस' लिहिलेलं असणार असं तर तुम्हाला सांगितलं तर नक्कीच संभ्रमात पडाल किंवा तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं होऊ शकतं. कारण ब्रिटनकडून अंतराळात एका कारखान्याची निर्मिती केली जात आहे. यात काही उत्पादनांची निर्मिती देखील केली जाणार आहे. घरगुती कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीचा हा कारखाना असणार आहे.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार अंतराळात उभारल्या जाणाऱ्या कारखान्यामध्ये हाय परफॉर्मन्स प्रोडक्ट्सची निर्मिती केली जाणार आहे. अंतराळातील गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेचा सुयोग्य वापर करत या वस्तूंची निर्मिती केली जाणार आहे. पृथ्वीवर अशा वस्तूंची निर्मिती केली जाणं शक्य नाही. त्यामुळे स्पेस फोर्ज नावाची कंपनी आपल्या रोबोट फोर्जस्टार ऑर्बिकल व्हीकलला अंतराळात पाठवणार आहे. या रोबोटचा आकार ओवन सारखा असणार आहे. या उपग्रहाला पृथ्वीपासून जवळपास ३०० ते ५०० मैल अंतरावर स्थिर करण्यात येईल. अंतराळात ऑटोमॅटिक प्रणालीवर हाय-परफॉरमन्स वस्तूंच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जाईल.
अंतराळातील निर्मितीमुळे ऊर्जेची बचत होणारमायक्रोग्रॅव्हीटी म्हणजेच शुन्य गुरुत्वाकर्षण वातावरणात वस्तूंची निर्मिती केली जाणार आहे. यात मानवाला आवश्यक अशा सेमीकंटक्टर, मिश्र धातू आणि फार्मास्यूटिकल्सची निर्मिती केली जाऊ शकते. स्पेस फोर्जच्या दाव्यानुसार अंतराळात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर वस्तू पृथ्वीवर बनणाऱ्या सेमीकंडक्टर वस्तूंच्या तुलनेत अधिक गुणवत्तापूर्ण असतील. या प्रकल्पामुळे पृथ्वीवर या वस्तूंच्या निर्मितीसाठी खर्च केल्या जाणाऱ्या ऊर्जेत मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे, असाही दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.