ब्रिटनच्या अनिवासी भारतीय गृहमंत्र्यांनीच भारताविरोधात मोर्चा उघडला; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 04:35 PM2022-10-06T16:35:24+5:302022-10-06T16:35:48+5:30
ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते.
ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री आणि अनिवासी भारतीय असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी भारताविरोधातच मोर्चा उघडला आहे. भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापार समझोत्याला विरोध केला आहे. यामुळे ब्रिटनमध्ये भारतीयांची गर्दी वाढू लागेल, असा त्यांचा दावा आहे.
ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते. यानंतर लगेचच त्यांच्या भारतातूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या व गृहमंत्री झालेल्या ब्रेव्हरमन यांनी याविरोधात वक्तव्य केले आहे. त्या लिज ट्रस यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत.
भारत सरकार दीर्घकाळापासून भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी आणि स्टडी व्हिसा वाढविण्याची मागणी करत आला आहे. या करारामुळे भारतीयांना ब्रिटनमध्ये एन्ट्री सोपी होऊ शकते. परंतू, आधीच ब्रिटनमध्ये जाऊन वसलेल्या या सुएला ब्रेव्हरमन यांनी याला विरोध केला आहे.
ब्रिटीश मासिक 'द स्पेक्टेटर'ला दिलेल्या मुलाखतीत ब्रेव्हरमन म्हणाल्या की, व्हिसा संपला तरी ब्रिटनमध्ये जास्त काळ राहणाऱ्यांच्या यादीत भारतीयांचाच जास्त भरणा आहे. माजी गृहमंत्री प्रिती पटेल यांनी गेल्या वर्षी भारतासोबत हा करार केला होता, त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तसेच व्हिसा संपला तरी लोक ब्रिटनमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.
यूकेच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2020 मध्ये 20,706 भारतीय इतर देशांच्या नागरिकांपेक्षा जास्त दिवस राहिले. 2020 मध्ये ज्या 473,600 भारतीयांचा व्हिसा 12 महिन्यांच्या आत संपणार होता, त्यापैकी 4,52,894 लोकांनी यूके सोडले, परंतु 4.4 टक्के लोक तिथेच राहिले. भारतीयांसाठी ब्रिटनची सीमा खुली करण्याच्या या धोरणाबाबत मी खूप चिंतित आहे, यासाठीच लोकांनी ब्रेक्झिटला मतदान केलेले नाहीय, असे त्या म्हणाल्या.