लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपली वाग्दत्त वधू कॅरी सायमंडस् यांच्याशी शनिवारी वेस्टमिनस्टर कॅथेड्रलमध्ये अत्यंत गुप्तता पाळून विवाह केला. यासंदर्भात त्या देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. लंडनमध्ये झालेल्या या विवाहाला निवडक पाहुण्यांना अगदी आयत्यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. जॉन्सन यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या विवाहाची गंधवार्ता नव्हती, इतकी त्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. लंडनच्या मध्यवर्ती भागात असलेले वेस्टमिनस्टर कॅथेड्रल शनिवारी दुपारी दीड वाजता अचानक बंद करण्यात आले. त्यानंतर अर्ध्या तासाने पंतप्रधान बोरिस जॉन्सन व त्यांची वाग्दत्त वधू कॅरी सायमंडस् हे चर्चमध्ये दाखल झाले, असे त्याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. बोरिस जॉन्सन हे ५६ वर्षांचे असून, सायमंडस् या ३३ वर्षे वयाच्या आहेत.
जॉन्सन २०१९ साली पंतप्रधान झाल्यापासून हे दोघेही लंडनमधील डाऊनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानी एकत्र राहत होते. आपला साखरपुडा झाल्याचे या दोघांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते. बोरिस व कॅरी यांना एप्रिल २०२० मध्ये पुत्ररत्नाचा लाभ झाला. या मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन असे आहे. बोरिस जॉन्सन व कॅरी हे जुलै २०२२ मध्ये विवाहबद्ध होणार असून, त्याचे निमंत्रण मित्र परिवाराला आतापासूनच पाठविण्यात आले आहे, असे वृत्त ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने या महिन्याच्या प्रारंभी प्रसिद्ध केले होते. (वृत्तसंस्था)दोनदा घटस्फोटितबोरिस जॉन्सन यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधांबाबत माहिती लपवून ठेवल्यामुळे त्यांना कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या धोरणविषयक समितीतून काढून टाकण्यात आले होते. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दोनदा घटस्फोट झाला आहे.