जमिनीखाली ३४०० वर्षांपूर्वीचं सोन्याचं शहर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:13 AM2021-05-01T06:13:58+5:302021-05-01T06:15:02+5:30

नुकतीच अशी घटना इजिप्तमध्ये घडली आहे. इजिप्तमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांना दक्षिणेकडील लक्झर या शहरात नाईल नदीच्या काठी उत्खनन करताना हे ‘सोन्याचं शहर’ सापडलं आहे.

An underground city of gold 3400 years ago! | जमिनीखाली ३४०० वर्षांपूर्वीचं सोन्याचं शहर!

जमिनीखाली ३४०० वर्षांपूर्वीचं सोन्याचं शहर!

Next

कोणताही देश असो, कोणताही कालावधी असो, जगभरात सोन्याचं आकर्षण प्रत्येकाला असतं. अगदी पुरातन काळापासून सोन्याचा हा सोस  आहे. भारतातही सोनं हा केवळ किमती धातू नसून संस्कृती आणि भावनांशी तो एकरूप झालेला आहे. पूर्वीच्या काळी सोन्याच्या शोधासाठी अखंड पायपीट केलेल्यांची आणि या शोधात प्राण गमवावे लागणाऱ्यांची संख्याही प्रचंड मोठी होती. खजिन्याच्या या शोधाच्या खऱ्या आणि खोट्या कहाण्या आजही चवीनं ऐकल्या, सांगितल्या जातात. कुठेतरी खोदकाम करताना सोन्याच्या माेहरा, दागिने सापडल्याच्या घटना आताही अधूनमधून ऐकायला येतात, पण सोन्याचं एखादं शहरच सापडलं तर?

- नुकतीच अशी घटना इजिप्तमध्ये घडली आहे. इजिप्तमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांना दक्षिणेकडील लक्झर या शहरात नाईल नदीच्या काठी उत्खनन करताना हे ‘सोन्याचं शहर’ सापडलं आहे. १९२२ मध्ये इजिप्तचा प्रसिद्ध राजा तुतनखामेन याच्या थडग्याचा शोध लागला होता. त्यानंतरची ही सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते. दहा किलो सोन्याचा मुखवटा असलेली तुतनखामेनची ममी त्यावेळी सापडली होती. आताच्या उत्खननात सापडलेल्या शहराचं नाव आहे एटन. या शहराचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते तब्बल ३४०० वर्षं पुरातन आहे. १८ व्या राजवंशातील राजा अमेन्होटेप -३ याने हे शहर वसवलं होतं. इसवीसनपूर्व १३९१ ते इसवीसनपूर्व १३५३ या काळात त्याची सत्ता होती. इजिप्तमधला हा सर्वात सोनेरी काळ मानला जातो. कारण, त्यावेळी इजिप्तची शक्ती आणि संस्कृतीचा मोठाच बोलबाला होता. 

३४०० वर्षांपूर्वीची घरंच नव्हे, तर त्याकाळची संस्कृती, अलंकार, ज्ञान-विज्ञान याचाही मोठा वारसा या उत्खननात सापडला आहे.  इजिप्तचे पुरातत्त्व खात्याचे माजी राज्यमंत्री व पुरातत्त्वशास्त्रज्ञ जही हवास यांच्या म्हणण्यानुसार तुतनखामेनचा १० किलोचा सोन्याचा मुखवटा ज्या ठिकाणी सापडला होता, त्याच्या जवळच ही जागा आहे. त्यावेळी अतिशय मौल्यवान अशा पाच हजार कलाकृतीही आढळून आल्या होत्या. तिथे अजूनही काहीतरी सापडेल, या आशेनं यापूर्वीही अनेक स्थानिक आणि परदेशी पुरातत्त्ववाद्यांच्या टीमनं अनेक वेळा तिथे पाहणी, उत्खनन केलं होतं. पण, कोणाला काहीच सापडू शकलं नाही. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता मात्र अचानकपणे या शहराचा शोध लागला आहे. पुरातत्त्ववाद्यांची एक टीम तुतनखामेनच्या शवगृहमंदिराचा शोध घेत असताना रेतीत गाडल्या गेलेल्या एटन या शहराचा शोध लागला.  हवास यांचं म्हणणं आहे, एटन हे प्राचीन इजिप्तमधील सर्वात मोठे प्रशासनिक आणि औद्योगिक शहर होतं. आजपर्यंत कोणत्याही पुरातन शहराचं उत्खनन करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात सुस्थितीतील पुरावे, कलाकृती, मातीची भांडी, वस्तू मिळाल्या नव्हत्या.  

या शहरात अनेक कबरी असून त्यात मोठ्या प्रमाणात सोन्याचा खजिना सापडू शकतो, असा संशोधकांचा कयास असल्यानं या शहराला सोन्याचं शहर असं म्हटलं जातं. सप्टेंबर २०२० मध्ये इथे उत्खननाला सुरुवात झाली होती, पण संपूर्ण उत्खननाला अजून किमान पाच वर्षं तरी लागतील, असा संशोधकांचा अंदाज आहे. उत्खननात एका व्यक्तीची कबरही सापडली आहे. या व्यक्तीच्या हातांजवळ शस्त्रं ठेवलेली होती आणि त्याचे पाय दोरीनं बांधलेले होते. दफन करण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत अत्यंत वेगळी मानली जाते. या शहराच्या दक्षिणी भागात एक मोठं स्वयंपाकघर आढळून आलं आहे. तिथे स्वयंपाकाची तयारी करण्यासाठीची जागा, भट्टी आणि मातीची भांडी ठेवण्याचा ओटाही आढळून आला आहे. या बेकरीचा आकार पाहिल्यावर तिथे मोठ्या संख्येत कर्मचारी असावेत आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्नही शिजवलं जात असावं, असं लक्षात येतं.

हे शहर त्या काळातही औद्योगिकदृष्ट्या किती प्रगत असावं, याचे नमुनेही येथे सापडले आहेत. एटन शहराच्या एका भागात काही कारखानेही आढळून आले, जिथे मातीपासून विटा बनवल्या जायच्या. काच आणि धातू गाळण्यासाठी कास्टिंगचे साचे आढळून आले. तिथे बहुधा ताईत आणि सजावटीच्या नाजूक वस्तू बनवल्या जायच्या. कताई आणि विणकाम उपकरणांसह धातू व काचेच्या वस्तू बनविण्याचेही पुरावे तिथे आढळून आले. एटन हे शहर नंतर संपूर्णपणे रिकामं करून ४०० किलोमीटर उत्तरेला अमरणा येथे ते वसवण्यात आलं. त्याचं कारण मात्र संशोधकांसाठी आजही मोठं कोडं आहे.

वैज्ञानिक प्रगती, सुरक्षा प्रणालीचा पुरावा

शहराच्या ज्या भागात सध्या उत्खनन सुरू आहे, तो भाग संशोधकांच्या दृष्टीनं निवासी आणि प्रशासनिक भाग असावा. विचारपूर्वक बनवण्यात आलेली घरं इथे नजरेस पडतात. त्यांच्या सुरक्षेचाही कडेकोट बंदोबस्त केल्याचं इथे आढळून येतं. या वस्तीच्या भोवती ‌सर्पाकृती आकाराची,  एक १० फुटी लांबचलांब नागमोडी भिंतही आढळून आली आहे. दहा फूट उंचीची ही भिंत फक्त एकाच ठिकाणाहून ओलांडली जाऊ शकते. सुरक्षा प्रणालीचा किती बारकाईनं विचार करण्यात आला होता, त्याचा हे भिंत म्हणजे एक पुरावा आहे.

Web Title: An underground city of gold 3400 years ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.