टोकियो: जपानची राजधानी टोकियोजवळ समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. यामुळे प्रशांत महासागरात अमेरिकेने बुडविलेली दुसऱ्या महायुद्धातील 'भूताची' जहाजे बाहेर आली आहेत. ही सर्व जहाजे युद्धात वापरण्यात आली होती.
जपानी मीडियानुसार इवो जिमा बेटाच्या पश्चिमेवरील समुद्रकिनाऱ्यावर ही जहाजे वाहून आली आहेत. पाण्याच्या आतमध्ये असलेला ज्वालामुखी फूकूतोकू-ओकानोबा जिवंत झाला आहे. यामुळे पाण्याखाली मोठमोठे स्फोट होत आहेत. या स्फोटांमुळे पाण्याच्या लोंढ्यामुळे समुद्र तळाशी गेलेली ही जहाजे किनाऱ्यावर ढकलली गेली आहेत. यामुळे ती आता पाण्याबाहेर आली आहेत.
इवो जिमा बेट टोकियोपासून 1200 किमी दूर आहे. अमेरिकी सैन्याने 1945 मध्ये दुसऱ्या महायुध्दावेळी ही जहाजे बुडविली होती. या जागतिक युद्धातील ही सर्वात भीषण लढाई होती. ही लढाई 36 दिवस सुरु होती आणि 70 हजार हून अधिक अमेरिकी सैनिकांनी यामध्ये भाग घेतला होता. जपानचे 19 हजारहून अधिक सैनिक मारले गेले होते.
ज्वालामुखीपासून बनलेल्या दगडांमध्ये बंकर बनविण्यात आले होते. त्यात 20 हजार हून अधिक जपानी सैनिक लपलेले होते. या भीषण लढाईत जपानचे केवळ 216 सैनिकच जिवंत पकडले गेले होते. अन्य सैनिक अमेरिकेच्या कारवाईत मारले गेले होते. यानंतर अमेरिकी सैन्याने त्या बंदरावर असलेली सर्व जहाजे आपल्या ताब्यात घेतली आणि बुडविली.
ज्वालामुखीच्या स्फोटामुळे इथे चंद्राच्या आकाराची छोटी, छोटी बेटे देखील बनली आहेत. ज्वालामुखीच्या राखेपासून ही बनली आहेत. समुद्रातील पाण्यात कालांतराने ही राख विरघळून जाईल असे सांगण्यात आले आहे.