संयुक्त राष्ट्रे : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) दक्षिण आशिया शाखेवर संयुक्त राष्ट्रांनी (युनो) मंगळवारी निर्बंध लादले आहेत. इसिसचा हा दक्षिण आशियातील दहशतवादी गट २०१५ मध्ये टीटीपीचा माजी कमांडर व पाकिस्तानी नागरिक हाफीज सईद खान याने स्थापन केला होता. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील अनेक घातक हल्ल्यांत त्याचा सहभाग होता आणि अल-कायदाशी संबंधही होते. या हल्ल्यांत १५० पेक्षा जास्त जण ठार मारले गेले होते.संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १,२६७ अल कायदा निर्बंध समितीने मंगळवारी इस्लामिक स्टेट इन इराक अँड द लेवांत-खोरासनवर (इसिल-के) निर्बंध लादले. तिची ओळख दक्षिण आशिया शाखा, इसिल खोरासन, इस्लामिक स्टेटचा खोरासन प्रांत आणि दक्षिण एशियन चॅप्टर आॅफ इसिल अशी आहे.पाकिस्तानातील जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याला युनोच्या निर्बंध समितीने १ मे रोजी जागतिक दहशतवादी जाहीर केले होते. जवळपास दहा वर्षांपासून मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यासाठी भारत आणि अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड प्रयत्न करीत होते.भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत (२००१ मधील संसदेवरील हल्ला आणि यावर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ला. यात ४० जवान ठार झाले होते) मसूद अझहरचा सहभाग होता. अझहरला दहशतवादी जाहीर केल्यामुळे त्याची संपत्ती गोठवली गेली असून, त्याच्यावर प्रवासाचे व शस्त्रास्त्रांचे निर्बंध आहेत.निर्बंध समितीने निवेदनात म्हटले आहे की, इसिस-के ला १० जानेवारी, २०१५ रोजी माजी तेहरिक- ए- तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) कमांडरने तयार केले आणि माजी तालिबानच्या गट कमांडर्सनी त्याची स्थापना केली. या कमांडर्सनी आम्ही इसिसशी आणि त्याचा नेता अबू बकर अल-बगदादी याच्याशी संलग्न आहोत, असे जाहीर केले होते.
इसिसच्या दक्षिण आशिया शाखेवर युनोचे निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 1:10 AM