अमेरिकेत कोरोनाचा जोर कमी होईना; जो बायडेन यांच्या सुरक्षेतील 200 कोरोनाग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 05:16 AM2021-01-24T05:16:24+5:302021-01-24T05:16:54+5:30
शपथविधी सोहळ्यात जवानांना झाला संसर्ग : उपचार सुरू
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीसाठी २५ हजारांहून अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते. त्यांपैकी सुमारे २०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले आहे. त्या जवानांवर उपचार सुरू आहेत.
अमेरिकी संसदेच्या कॅपिटॉल इमारतीवर ट्रम्प समर्थकांनी ६ जानेवारी रोजी हल्ला केला व तिथे हिंसाचारात काहीजण ठार झाले. या देशाच्या लोकशाही इतिहासाला काळिमा फासणारी ती घटना होती. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना चिथावणी दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे जो बायडेन यांच्या शपथविधीच्या वेळी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यावेळी कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी शरीराचे तापमान मोजण्यापासून ते फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची सर्व प्रकारची काळजी अमेरिकी प्रशासनाने घेतली होती. इतके करूनही बायडेन यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सुमारे २०० जवानांना कोरोनाची बाधा झाली.
सहा लाखांहून अधिक बळी जाण्याची शक्यता
अमेरिकेत कोरोनामुळे सहा लाखांहून अधिक लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे, असा इशारा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. कोरोना लसीकरण मोहीम अमेरिकेने सुरू केली असली तरी तिथे या साथीचा जोर कमी झालेला नाही. कोरोना साथीमुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
ब्रिटनचा नवा विषाणू अधिक धोकादायक
ब्रिटनमधील नवा कोरोना विषाणू हा मूळ विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहे, असे संशोधनातून आढळून आले आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, ५४ लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली.
टेबलवरून हटविले डाएट कोक बटण
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ज्यावेळी डाएट कोक पिण्याची लहर यायची तेव्हा ते त्वरित मागविण्यासाठी आपल्या टेबलाजवळ त्यांनी एक बटण बसविले होते. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे डाएट कोक बटण काढून टाकले आहे.
संघाशी संबंधित दोघांना ठेवले दूर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या प्रचारकार्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले व रा. स्व. संघाशी संबंधित असलेले सोनल शहा व अमित जानी या दोघांना बायडेन यांनी सत्तेत आल्यानंतर अद्याप कोणतीही खास जबाबदारी सोपविलेली नाही.