मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 09:11 AM2019-03-28T09:11:17+5:302019-03-28T09:13:37+5:30
मसूदला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी हालचाली सुरू; चीन पुन्हा खोडा घालण्याची शक्यता
नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेनं पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ब्रिटन आणि फ्रान्सनं पाठिंबा दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्याबद्दलचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात आणण्यात आला होता. मात्र चीननं नकाराधिकार वापरुन तो हाणून पाडला.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अजहरचा समावेश काळ्या यादीत करण्यासाठी अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेकडे हा प्रस्ताव सोपवण्यात आला आहे. मात्र यावर नेमकं मतदान कधी होणार, याबद्दलची घोषणा करण्यात आलेली नाही. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मसूद अजहरवर बंदी येऊ शकते. याशिवाय त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. मसूदच्या परदेश यात्रांवरदेखील निर्बंध आणले जाऊ शकतात.
अजहरवर बंदी घालण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव आणला होता. मात्र त्यावरील मतदानात चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे अजहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना सुरुंग लागला. चीननं चौथ्यांदा संयुक्त परिषदेत अजहरचा बचाव केला. अजहरबद्दलची माहिती आणि पुरावे गोळा करत असल्याचं चीननं म्हटलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे पाच सदस्य आहेत. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीनचा समावेश आहे. प्रस्तावावरील मतदानावेळी यातील एकाही देशानं नकाराधिकार वापरल्यास प्रस्ताव रद्द केला जातो.